आष्टी (प्रतिनिधी)
Gangai Babaji mohotsav ashti शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी – पाटोदा – शिरूर चे माजी आमदार, शिक्षणमहर्षी भीमराव धोंडे साहेब यांच्या आई वडिलांच्या नावाने गेली १९ वर्षे सुरू असलेला गंगाई – बाबाजी महोत्सव आणि गंगाई – बाबाजी आदर्श पुरस्कार वितरण सोहळा हा राज्यातील अत्यंत आगळावेगळा आणि दिमाखदार सोहळा आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री कल्याणी चौधरी यांनी केले.
भगवान महाविद्यालय आष्टीच्या वतीने आयोजित गंगाई – बाबाजी महोत्सवानिमित्त दिल्या जाणाऱ्या गंगाई – बाबाजी आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी – पाटोदा – शिरूरचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी भीमराव धोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास पाटोदा पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड, ह. भ. प. दिनकर महाराज तांदळे, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. अजय दादा धोंडे, अभय दादा धोंडे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, रामराव खेडकर,
रामदास बडे, पांडुरंग नागरगोजे, रत्नदीप निकाळजे, बबनराव आवटे, सुदाम काका झिंजुर्के, सरपंच दादा जगताप, अन्सार शेख, अशोक साळवे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, सिने पत्रकार भगवान राऊत, रावसाहेब लोखंडे, बाळासाहेब शेकडे, महारुद्र खेडकर, सदाशिव तुपे, संतोष गोल्हार, राजेंद्र धोंडे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सिने अभिनेत्री कल्याणी चौधरी म्हणाल्या की, माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी – पाटोदा – शिरूर या ग्रामीण भागातील शेतकरी, ऊस तोडणी कामगार व गोरगरिबांच्या मुला – मुलींच्या शिक्षणासाठी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून या दुष्काळी भागामध्ये शिक्षणाची गंगा आणली.
त्यामुळे हजारो तरुण तरुणींना शिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभे राहता आले. त्यामुळे मा. आ. भीमराव धोंडे शिक्षण महर्षी या नावाने संबोधले जावे. असे त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य आहे. त्यांच्या आई-वडिलांच्या चिरंतन स्मृती जपण्यासाठी ते गेली १९ वर्षे गंगाई – बाबाजी महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील गुनिजनांचा गंगाई बाबाजी आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करतात.
समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांच्या पाठीवर पुरस्काराच्या रूपाने शाबासकीची थाप देतात. या पुरस्कारामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन आणि बळ मिळते. त्यामुळे अशा कार्यक्रमाची समाजाला गरज आहे असे त्या म्हणाल्या.
माजी आमदार भीमराव धोंडे साहेब म्हणाले की, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्तींकडून विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्याची प्रेरणा घ्यावी. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची मनोभावे सेवा करावी.
ज्यांनी आपल्याला हे जग दाखविले त्या आपल्या आई – वडिलांना दैवत मानावे. विद्यार्थी, विद्यार्थिनींना आपले चांगले भवितव्य घडविण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही.
आगामी काळात चांगला समाज घडविण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. ‘वाचाल तर वाचाल आणि शिकेल तो टिकेल’ असेही ते शेवटी म्हणाले. सर्व पुरस्कार प्राप्त गुणवंतांचे त्यांनी कौतुक केले व भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी ह. भ. प. पांडुरंग जाधव गुरुजी, प्राचार्य निंभोरे सर व साहित्यिक प्रा. डॉ. सुधाकर शेलार या पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपली प्रातिनिधीक स्वरूपातील मनोगते व्यक्त केली. प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला.
उपप्राचार्य डॉ. अप्पासाहेब टाळके, प्रा. श्रीकांत धोंडे व प्रा. संभाजी झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. बापू तोरडमल यांनी आभार मानले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व गंगाई – बाबाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
तर सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पुरस्कार प्राप्त, गुणवंत, त्यांचे नातेवाईक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व आष्टी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.