प्रबोधन युगाचे पितामह महात्मा फुले होत- लहू कानडे
अहिल्यानगर
Ahilyanagar satyashodhak samaj adhiveshan महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या प्रबोधन युगाचे पितामह असून त्यांच्या विचारातून लोकशाहीचा पाया घातला गेला. सध्या लोकशाही धोक्यात असून सत्यशोधक समाजाला प्रबोधनाबरोबरच संविधान वाचविण्यासाठी करणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक लहू कानडे यांनी व्यक्त केले.
अहिल्यानगर येथे सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. सत्यशोधक उत्तमराव पाटील हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रसिद्ध वकील ॲड. दिशा वाडेकर यांना डॉ. बाबसाहेब आंबेडकर उल्लेखनीय वकील पुरस्कार व मंगलोर येथील पत्रकर सुकन्या शांता यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव खराडे यांनी केले. यावेळी त्यांनी सत्यशोधक समाज हा समतेवर आधारित समाज निर्मितीसाठी कार्यरत असून जातीपाती विरहीत व्यवस्था करण्यासाठी निर्माण प्रयत्न करीत आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी सत्यशोधक समाजाचा इतिहास, कार्य व पुढील जबाबदाऱ्या याबाबत मांडणी केली. सत्यशोधक समाज ब्राम्हण जातीच्या विरोधात नसून हा समाज ब्राह्मण्यवादाविरोधात काम करतो असे त्यांनी स्पष्ट केले
यवतमाळ येथील सत्यशोधक विद्यापीठाचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी राजकारण आणि सत्यशोधक विचार वेगळा नसून आपण त्यापासून फारकत घेतल्यामुळे समाज राजकीयदृष्ट्या मागे राहल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सत्यशोधक होणे म्हणजे जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणणे होय, असेही ते म्हणाले. वर्धा येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चोपडे यांनी ब्राह्मणी व्यवस्थेने सत्यशोधक चळवळीचे पद्धतशीर पद्धतीने हनन केले असून सत्यशोधक साहित्याची चिकित्सा झाली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी पुरस्कार प्राप्त ॲड. दिशा वाडेकर यांनी या देशात अजुनही सार्वजनिक क्षेत्रात जातीव्यवस्था टिकून असून आजही तुरुंगामध्ये ती पाळली जाते असे त्यांनी स्पष्ट केले. सत्यशोधक समाजाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांनी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या निर्मितीची का केली याची कारणे नमूद केली.
महात्मा फुले यांनी मनुवादी धर्माची चिकित्सा केली. त्याची आजही गरज असून चळवळ समजून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणून राहिले. या देशातील सांस्कृतिक वर्चस्ववाद समजून घेतला पाहिजे असेही त्यांनी यावेळी नमुद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन झगडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी व्यक्त केले.