मुंबई,
nana patole on pmmodi मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लीम द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता देशातील जनता नरेंद्र मोदींच्या थोपेबाजीला बळी पडणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यावर सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत. मुस्लीमांना संपत्ती वाटणार हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेच नाही हे स्पष्ट असतानाही नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा काँग्रेस मुस्लीमांना संपत्ती वाटणार असा अपप्रचार करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. आरक्षणाला आरएसएस व भाजपाचाच विरोध आहे उघड असताना काँग्रेस एस.एस., एस.टी. व ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लीमांना देणार या आरोपात काहीही तथ्य नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तींनी काहीतरी ताळतंत्र ठेवून बोलावे अशी अपेक्षा असते पण आरएसएसच्या खोटे पसरवण्याच्या शिकवणीतून नरेंद्र मोदी यापेक्षा वेगळे काही बोलू शकतील असे वाटत नाही. काँग्रेसवर मुस्लीम तुष्टीकरणाचे आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या भाजपाने आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसमशी युती केली आहे. याच तेलुगु देसमने हज यात्रेसाठी १ लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे हे मोदींना कसे चालते? असा सवाल पटोले यांनी केला आहे.
घाटकोपर भागात कालच होर्डिंग दुर्घटनेत १४ नागरिकांचा बळी गेला आहे, मुंबईकरांसाठी हा एक मोठा धक्का आहे परंतु भाजपा व नरेंद्र मोदी यांना या घटनेचे काहीही गांभिर्य नाही, ज्या घाटकोपर भागात ही घटना घडली त्याच भागातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होतो हे संताप आणणारे आहे यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाची असंवेदनशीलता दिसून येते, असेही नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस विरोधी पक्षही बनू शकणार नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकली आहे असे असेल तर या पक्षांची एवढी चिंता करण्याची नरेंद्र मोदी यांना काय गरज आहे? वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव होत आहे या चिंतेने नरेंद्र मोदी यांची झोप उडाली आहे, या भितीपोटी ते काहीही बोलत आहेत. काँग्रेसचे दुकान बंद होण्याची चिंता करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी त्यांची व भाजपाच्या पराभवाची चिंता करावी, असेही नाना पटोले म्हणाले.
[…] नरेंद्र मोदींनी काँग्रेसची चिंता करू… […]