शिवसंग्राम लोकसभा निवडणुकीत ‘तटस्थ’ राहणार

- Advertisement -
- Advertisement -

 

पुणे

Shivsangram mete news लोकसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष महायुती किंवा महाविकास आघाडी कोणालाही समर्थन देणार नाही. लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय झाला असून, लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसंग्राम पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मंथन बैठकीचे आयोजन पुण्यातील बाळासाहेब ठाकरे सभागृहात शनिवारी करण्यात आले होते. त्यानंतर मेटे पत्रकारांशी बोलत होत्या. प्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, चेतन भालेकर, विनोद शिंदे, लहू ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक आदी उपस्थित होते.

डॉ. ज्योतीताई मेटे म्हणाल्या, “लोकनेते विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर प्रथमच लोकसभा निवडणूक होत आहे. बीड लोकसभेच्या अनुषंगाने भूमिका जाहीर करण्याचा निर्णय यापूर्वीही झाला होता. त्यामुळे तटस्थतेचा निर्णय घ्यायला उशीर झाला असे नाही. आता सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लोकसभेसाठी तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकारणात अनुषंगिक भूमिका असतात. त्यामुळे नाराजीचा प्रश्न उपस्थित होत नाही. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यालाच राजकारणात महत्व असते. आमचीही भूमिका अशीच होती. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत बीडच्या जनतेची इच्छा होती. त्यामुळे आमच्या संघटना पातळीवर हा विचार झाला होता. जनतेचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने बीडमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. कारण यासाठी आम्ही लोकसभा क्षेत्रात सखोल चाचपणी करून त्यानांतर जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठी आम्ही लोकसभेतून माघार घेतली.”

तानाजीराव शिंदे म्हणाले, “लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही पुन्हा राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊ. यानंतर विधानसभेची तयारी केली जाईल. शिवसंग्राम विधानसभेच्या १२ जागा लढवणार आहे, हे आम्ही याआधीही जाहीर केले आहे. विधानसभेच्या दृष्टीने जी काही रणनीती आखावी लागेल, यासाठी ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल किंवा ज्यांच्यासोबत युती करावी लागेल याचाही विचार योग्यवेळी केला जाईल. आम्ही महायुतीमध्ये होतो, हा भुतकाळ आहे. नाराजीचा प्रश्न नसून सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आम्ही मतदान करणार पण कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles