मुंबई,
State teacher award maha 2023 सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.
समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहे.
सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २५ ऑगस्ट, २०२३ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार प्राथमिक प्रवर्गात ३७, माध्यमिक प्रवर्गात ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) १९, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ, विशेष शिक्षक कला/ क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट गाईड साठी दोन असे एकूण १०८ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय १ सप्टेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आला आहे.
अण्णासाहेब घोडके हे महाराष्ट्रातील एक प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. ते सध्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंभोरा येथे कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी ता.पाटोदा या शाळेवर 10 वर्ष कार्य केले आहे तसेच राज्य शासनाने निवड केलेल्या आदर्श शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी ता.आष्टी या शाळेवर 5 वर्ष कार्य केले आहे.
भारत सरकारच्या दीक्षा पोर्टलवर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व्हिडीओ निर्मितीमध्ये त्यांनी कार्य केले आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सेतू अभ्यास निर्मिती मध्ये सन 2021 ,2022 आणि सन 2023 मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे विज्ञान विषयासाठी तज्ञ म्हणून कार्य करत आहेत .तसेच सन 2023 मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विज्ञान विषयाच्या कृतीपुस्तिका निर्मितीमध्ये इयत्ता सहावी कृतीगटात तज्ञ म्हणून कार्य केले आहे. यासोबतच शिक्षणाची वारी, स्कुल फ्रॉम होम, व्हर्च्युअल क्लास आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी सारख्या विषयावर तज्ञ म्हणून कार्य करीत आहेत. आयसर (IISER) सारख्या नामांकित संस्थेकडून त्यांना इनोव्हेशन चॅम्पियन घोषित करून प्रशिक्षणे घेण्यासाठी त्यांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र शासन आयोजित नवोपक्रम स्पर्धेत सन 2022 – 23 मध्ये त्यांच्या नवोपक्रमास बीड जिल्ह्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी राष्ट्रीय / राज्य स्तरावर पाच शोध प्रबंध / निबंध सादर केले असून नुकतेच त्यांच्या प्रबंधास यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने रोबोटिक्स विषयासाठी शरद पवार फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सध्या ते रोबोटिक्स प्रकल्पावर कार्य करत आहेत.
वाचन आणि लेखनाची आवड असलेले अण्णासाहेब घोडके यांचे आजपर्यंत 5 पुस्तके प्रकाशित झाले असून 2 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. यासोबतच विविध वर्तमानपत्र तसेच मासिके आणि पुस्तके यामध्ये लेख प्रकाशित झालेले आहेत.
शाळेवरील राबवलेल्या विविध उपक्रमामध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राअंतर्गत विज्ञान प्रदर्शनात मिळालेले यश , विज्ञान नाटिका , पुस्तक बाग, 21 व्या शतकातील कौशल्य विकसनासाठी रोबोटिक्स, तंत्रज्ञान आणि शिक्षण, तयारी स्पर्धा परीक्षेची , कोण होईल ज्ञानवंत ? , वनराई बंधारे , ओळख शास्त्रज्ञांची , कलादालन, हस्ताक्षर सुधार प्रकल्प इत्यादी उपक्रम प्रसिद्ध आहेत. तयारी स्पर्धा परीक्षेची या उपक्रमाचे अनुकरण राज्यातील अनेक शाळा करत आहेत.
या सर्व कार्यासोबत ते एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर , पक्षीमित्र ,सर्पमित्र आहेत. या निसर्ग प्रेमातून त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी घन वन समन्वयक म्हणून कार्य करून घन वन पद्धतीने वृक्ष लागवड केली आहे. तसेच ते उत्तम निवेदक असून महाराष्ट्र शासन आयोजित शासन आपल्या दारी सारख्या महत्वपूर्ण उपक्रमात त्यांनी निवेदक म्हणून सहभागी झाले आहेत.
आष्टी सारख्या ग्रामीण भागातील शिक्षकाला राज्यस्तरावरील गुणगौरव सन्मान मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे.