अकोले,
ऋणानुबंध संस्थेचा २०२४- २५ चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील माऊली सभागृहामध्ये शनिवारी पार पडला.
ऋणानुबंध संस्थेचे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार यावर्षी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना समर्पित होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजाला प्रेरणा देणारे वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या समाजातल्या विविध घटकांचा सन्मान या पुरस्काराच्या निमित्ताने ऋणानुबंध करत असते.
यावर्षीच्या या सोहळ्यात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापौर सौ ज्योती गाडे, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, नितीन उदमले, बेरड सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आपली आई ही संस्काराची पहिली शाळा असून माझ्या आईने मला पुनर्जन्म देऊन समाजाची सेवा करण्याची संधी दिली त्यामुळे मी साडेचार लाख रुग्णांना दृष्टी देऊ शकलो आज आठ मातांचा सन्मान करता आला हे माझ्या आईची पुण्याई व आशिर्वाद आहेत. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर तात्याराव लहाने बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत बंडगर यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ऋणानुबंधाचे अध्यक्ष अजित रोकडे यांनी ऋणानुबंध व जिल्हा परिषद करत असलेल्या डिजिटल डिटॉक्स इंडिया या मुलांच्या मोबाईल अतिवापराविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेची माहिती दिली. आतापर्यंत सुमारे 210 शाळांमधील 21 हजार पालकांचे समुपदेशन पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. महिला सन्मान सोहळ्यासाठी अत्यंत पारदर्शक पद्धतीने योग्य महिलांची निवड करताना त्यांचा सन्मान केल्याने समाजातील अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पुरस्कार प्राप्त महिला या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असून त्यांनी त्या त्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मान करण्यात आलेल्या महिलांमध्ये पारंपारिक लाकडी वस्तूंचा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने करून तो सातासमुद्रा पार नेणाऱ्या जामखेडच्या दैवशाला गुळवे, मवेशी राजुर सारख्या आदिवासी भागात विद्यार्थी आणि आदिवासी महिलांसाठी गरीब मुलीसाठी मोठे काम उभे करणाऱ्या मुख्याध्यापिका मंजुषा काळे, यवतमाळ येथे सरकारी दवाखान्यात भरती झालेल्या रुग्णांना व नातेवाईकांना मोफत भोजन पुरवणाऱ्या सुमनताई सोनवणे,कृषी ड्रोन च्या माध्यमातून शेतात औषध फवारणी करणाऱ्या नीलम दिवेकर,मानस ग्राम स्नेहालयात मुलांच्या डिजिटल व्यसनाधीनतेवर मानसोपचार करणाऱ्या डॉक्टर तेजस्विनी मिस्कीन, नगर मधील डॉक्टर गौरी कुलकर्णी,मुळा धरण परिसरातील शिक्षिका मंदा फलके यांचा ऋणानुबंध राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.श्रीमती रजनी बोर्डे यांचा आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ऋणानुबंधच्या कामाचे कौतुक करून पुरस्कारासाठी निवड झालेल्या महिलांचे अभिनंदन केले उपस्थित महिला व सर्व प्रेक्षकांना डिजिटल साधनांचा संतुलित वापर करण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी पुरस्कारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगळं काम उभं करणाऱ्या महिलांच्या निवडी संदर्भात समाधान व्यक्त केले.
पुरस्कारप्राप्त महिलांना या पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा प्राप्त होईल व इतरांसाठी त्यांचे काम दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महापौर सौ ज्योती गाडे यांनी सर्व सन्मानमूर्तिंचे अभिनंदन करून उपस्थिताना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या सव्वा तास चाललेल्या भाषणांनी उपस्थित श्रोत्यांना अक्षरशा खिळवून ठेवले. ग्रामीण भाषा शैली आणि काळजाला भिडणाऱ्या त्यांच्या हृदयस्पर्शी शब्दांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. ऋणानुबंध संस्थे च्या कार्याचे कौतुक करत असतानाच महिलांच्या सन्मानाने विशेष आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक महिला प्रत्येक आई ही मुलाची पहिली शाळा व पहिला गुरु असतो. आई इतके निस्वार्थी या जगात कोणी नाही काम करताना हाताच्या पुसट होत जाणाऱ्या रेषा मुलांचे भविष्य घडवतात असे सांगून त्यांनी त्यांच्या लहानपणापासूनचा जीवन प्रवास श्रोत्यांना कथन केला.
31 वर्षांपूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना किडनी दिली व शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला ही किडनी नाही चालली तर दुसरीही काढ असे सांगितले हा प्रसंग ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले. आरोग्य जपण्यासंदर्भात बाबत काही सूचना करताना त्यांनी जंक फूड टाळण्याचे आवाहन केले तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळण्याबाबत सांगितले.
मोबाईल वापराबाबत त्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे सांगितले मोबाईल वापरताना तयार होणाऱ्या लहरी मुळे कॅन्सर सारखे दुर्धर आजार होऊ शकतात हे सांगतानाच त्यांनी ब्लूटूथ किंवा हेडफोन वापरण्याचे आवाहन केले. झोपताना किंवा मोबाईल चार्ज करताना दूर अंतरावर ठेवण्याबाबत त्यांनी सांगितले. ऋणानुबंधाच्या डिजिटल डिटॉक्स इंडिया या मोहिमेचे कौतुक त्यांनी केले आणि पालकांनी मुलांना अनावश्यक फोन वापरायला देऊ नये हे आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका सारिका रघुवंशी यांनी मानले तर सूत्रसंचालन भारती कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऋणानुबंधाच्या कलाकारांनी सुरेख गीत गायन करून उपस्थितांचे मन जिंकून घेतले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन परदेशी डॉक्टर विवेकानंद कंगे, डॉक्टर खंडागळे,भानुदास महानूर,महेश घावटे,जीवन महाजन, प्रतिभा साबळे, अजय आदमाने सोमवंशी दांपत्य,वंदना कुलकर्णी प्राची लाटे,सीमा रघुवंशी, स्वाती कुमठेकर,आंबेकर,विजय मोरे,बाबासाहेब जगताप, मोनाली डॉक्टर झेंडे,उमेशचंद्र सुद्रिक व ऋणानुबंधाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

