Home Blog

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान

पुणे ,प्रतिनिधि

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाड डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यापूर्वी दि. १३ जून रोजी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती.

या पाहणीमध्ये योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते.बैठकीत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संमेलनासाठी आवश्यक असलेले भव्य प्रांगण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था तसेच विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रविवारी झालेल्या बैठकीस ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांद्वारे शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

पिकअप विहिरीत पडून आठ भाविकांचा मृत्यू

सोलापूर, प्रतिनिधी

Pandharpur solapur Eight devotees die after pickup vehicle falls into well सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात मोठी दुर्घटना (Accident) घडली असून एका विहिरीत पिकअप पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पंढरपूर तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून सर्वजण पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याचे समजते.

म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले असताना येथील विहिरीत त्यांचे पिकअप वाहन पडले. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. . या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलं आहे. अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली आहे. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप वाहन विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा समावेश आहे. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावानजीक हा अपघात झाला आहे.

ही विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती. या विहिरीला कोणतेही कठडे नव्हते, त्यामुळे पिकअप थेट पाण्यात गेले आणि या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

या घटनेतील मृत्यू झालेल्या मध्ये 4 लहान मुलांचा आणि 4 महिलांचा समावेश आहे. तसेच या घटनेत 2 जण बचावले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विहिरीभोवती लोकांनी गर्दी केली आहे, सर्वजण मदतकार्यात व्यस्त आहेत.

अपघातातील मृत्यू पावलेल्यांची नावे

  1. इंदुबाई दशरथ बावचे
  2. पूजा अमोल सातोरे
  3. पूजा बालाजी बावचे
  4. अश्विनी संदीप बावणे
  5. संस्कार संदीप बावणे
  6. संस्कृती संदीप बावचे
  7. आरव अमोल सातोरे
  8. समर्थ बालाजी बावणे
    …………………
    जखमी नावे
  9. संदीप दशरथ बावचे
  10. बालाजी दशरथ बावचे
  11. जीया बालाजी बावचे
  12. आरव बालाजी बावचे
  13. सागर सावकार चौगुले

कृषी मित्र भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा

मुंबई, दि. ११ :

fake job krushi mitra राज्यात “कृषी मित्र” भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकरी, युवक व नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणीही याला बळी पडून नये असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित जाहिराती, अर्जासाठी शुल्क भरण्याच्या सूचना, वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन किंवा संशयास्पद लिंक यांना बळी पडू नये.

यासंदर्भात माहिती देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “कृषी मित्र भरतीच्या नावाखाली शेतकरी, युवक आणि नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही. खोट्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित करून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती अथवा संबंधितांवर कृषी विभागामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा बोगस जाहिरातींपासून सावध राहून भरतीसंदर्भातील माहितीची खातरजमा अधिकृत माध्यमांतूनच करावी.”

नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद जाहिराती किंवा संदेश आढळल्यास तात्काळ संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयास अथवा स्थानिक पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, असेही आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

नाशिकच्या गंगापूर धरणात बुडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

Nashik

nashik news four drown in gangapur dam नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या फुगवटा परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत चार जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलगे आणि एका २१ वर्षीय तरुणीचा समावेश असून या घटनेमुळे सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गणेश गोतरणे (वय १६), साहिल गोतरणे (वय १६), निखील गोतरणे (वय १६, तिघेही रा. सावरगाव, नाशिक) आणि मयुरी जाधव (वय २१, रा. तळेगाव अंजनेरी, नाशिक) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

हेही वाचा : श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर दीड किलो सोन्याचा नवीन कळस

सावरगाव येथील गोतरणे कुटुंबाने पारंपरिक धोंड्याच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते. दुपारच्या जेवणानंतर मयुरी जाधव हिने गंगापूर धरणाचा फुगवटा पाहण्यासाठी जाण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ती आणि इतर पाच जण धरण परिसरात गेले. सुरुवातीला सर्वजण उथळ पाण्यात खेळत होते. मात्र पाण्याची खोली आणि तळातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अचानक एक मुलगा पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात इतरही जण खोल पाण्यात गेले. यावेळी एका युवकाने एका मुलीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र मयुरी जाधव आणि तीन अल्पवयीन मुले पाण्यात बुडाली. घटनेतून बचावलेल्या मुलाने गावात धाव घेऊन माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांनी शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच बोट व इतर साधनांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर चौघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्घटनेमुळे सावरगावसह परिसरात शोककळा पसरली असून तीन चुलत भावंडांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गोतरणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गंगापूर धरणात सध्या सुमारे ३५ टक्के जलसाठा असून फुगवटा परिसरात खोल खड्डे आणि अचानक वाढणारी खोली यामुळे अशा भागात पाण्यात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर दीड किलो सोन्याचा नवीन कळस

कोल्हापूर,

kolhapur ambabai mandir golden कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला जात आहे. अधिक महिन्याच्या पवित्र पर्वकाळात मंदिराच्या शिखरावर सुमारे दीड किलो सोन्याचा नवीन कळस बसविण्याचे काम आज सुरू झाले आहे. या कळसाची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे.. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, शिखरावर कळस बसविण्याचे काम रात्री सुमारे ३ वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंदिराला देश-विदेशातील भाविकांकडून सातत्याने देणग्या मिळत असतात. गोव्यातील एका भाविकाने हा सोन्याचा कळस देवस्थानाला अर्पण केला आहे.

पारंपरिक भारतीय स्थापत्यशैलीत तयार करण्यात आलेल्या या कळसात मंगोलियन शैलीची कलात्मक झलकही दिसून येते. कुशल कारागिरांनी अनेक दिवसांच्या परिश्रमानंतर त्याला अंतिम स्वरूप दिले आहे. मंदिरावरील विद्यमान कळस ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असल्याने त्याचे जतन करून भविष्यात प्रदर्शनासाठी ठेवण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे..

शिर्डीत १२-१३ जून रोजी पीएचडीसीसीआयची तिसरी जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद – सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पर्यटन विकासाचा केंद्रबिंदू

नवी दिल्ली, दि. १० जून २०२६

Shirdi World Spiritual Tourism conference पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) यांच्या वतीने, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या सहकार्याने ‘रूहमॅन्टिक : पीएचडीसीसीआयची तिसरी जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद’ दि. १२ व १३ जून २०२६ रोजी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या नवीन शैक्षणिक संकुलातील सांस्‍कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.


भारताच्या वेगाने वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी या परिषदेत धोरण निर्माते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, हॉटेल व आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, ट्रॅव्हल कंपन्या तसेच विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यंदाच्या परिषदेचा विशेष भर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ वर असून, या महोत्सवाला महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पर्यटन विकासासाठी आणि जागतिक पर्यटन आकर्षण वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी म्हणून पाहिले जाणार आहे.


परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव श्री भुवनेश कुमार (आयएएस) उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री निलेश आर. गटणे (आयएएस), व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी; श्री गोरक्ष गाडीलकर (आयएएस), मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी; श्री मंगेश जोशी (आयएएस), संचालक, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय; सौ. जयश्री विष्णू थोरात, अध्यक्षा, शिर्डी नगर परिषद, शिर्डी; तसेच श्री अभय शेळके पाटील, उपाध्यक्ष, शिर्डी नगर परिषद, शिर्डी हे मान्यवर परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.

३२३’हेही वाचा :राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात मोठया उत्साहात पार ;दादांना समर्पित करणारा वर्धापन दिन


उत्तर प्रदेश शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव (पर्यटन, संस्कृती व धार्मिक कार्य) श्री अमृत अभिजात (आयएएस) यांचे विशेष आभासी (Virtual) प्रमुख भाषण हेही परिषदेचे आकर्षण ठरणार आहे.


या परिषदेदरम्यान PHDCCI-KPMG यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या “From Darshan to Destination: The Transformation of Spiritual Tourism in India” या अहवालाचे प्रकाशन होणार आहे.

यात्रेकरूंच्या बदलत्या प्रवृत्ती, नव्या पर्यटन संकल्पना, आवश्यक पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन आणि श्रद्धा-आधारित पर्यटनाचा वाढता आर्थिक प्रभाव यावर या अहवालात सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे.
परिषदेत पुढील विषयांवर विशेष सत्रे आयोजित करण्यात आली आहेत


Shirdi World Spiritual Tourism conference ‘सिंहस्थ २०२७ : कुंभ ते आध्यात्मिक पर्यटन कॉरिडॉर’ –

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून प्रादेशिक विकास आणि जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटन परिसंस्था उभारण्याविषयी चर्चा.
‘२४ तास आध्यात्मिक अनुभवांची निर्मिती’ – रात्रकालीन पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटक सहभाग वाढविण्याच्या संधींचा आढावा.
‘श्रद्धेची वास्तुरचना’ – मंदिर वास्तुकला, वारसा संवर्धन आणि सांस्कृतिक कथन यांचा पर्यटन अनुभवावर होणारा परिणाम.
‘रूहमॅन्टिक रिफ्लेक्शन्स’ – अध्यात्म, आरोग्य आणि सजग प्रवास (Mindful Travel) यांतील वाढता संबंध.
परिषदेच्या निमित्ताने सहभागी प्रतिनिधींना श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे अभ्यासदौरा (Familiarization Visit) आयोजित करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात मोठया उत्साहात पार ;दादांना समर्पित करणारा वर्धापन दिन…

मुंबई दि. ११ जून –

Nationalist congress party 27th anniversary आपली एकजूट… आपली एकनिष्ठा आणि आपले कष्ट याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नव्या जोमाने आत्मविश्वासाने आणि नव्या निर्धाराने कामाला लागुया…

असे आवाहन करतानाच वादळाला पाहून आम्ही आमची गलबते कधी वळवली नाही… संकटाना सामोरे जाताना आम्ही आमची पाऊले कधी रोखली नाही… घड्याळाच्या काट्यांच्या हा प्रवास आता थांबणार नाही संघर्षाच्या या रणांगणात राष्ट्रवादी कधीही मागे हटणार नाही असा स्पष्ट इरादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात स्पष्ट केला.

स्वाभिमानातून आपल्या पक्षाची स्थापना झाली आहे. शरद पवारसाहेब, अजितदादा आदींसह पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांसह ज्ञात – अज्ञात व्यक्तीचे पक्षाच्या जडणघडणीत योगदान आहे. आदरणीय दादा आपल्यात नाहीत. त्यांच्या पश्चात होणारा हा पहिलाच वर्धापन दिन आहे.

नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सर्वांना लाभला आहे. या महापुरूषांच्या विचारांचा वारसा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. आदरणीय दादांना जो विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता तसाच महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहिल असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

शिव-शाहू- फुले – आंबेडकरांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेसची जी विचारधारा आहे ती पुढे घेऊन जाणं याचाच अर्थ सर्वांना सोबत घेऊन जाणं आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असेल इथल्या तळागाळातील प्रत्येक घटकांनी अठरापगड जातींनी मोलाचे योगदान दिले आहे.

देशाच्या आणि राज्याच्या लढयामध्ये कुठलाही समाज मागे नव्हता याची जाणीव आपण सर्वांनी सतत ठेवायला हवी असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

आजच्या वर्धापन दिनाची समर्पण संघर्ष आणि संकल्प अशी थीम होती. ही संकल्पना आदरणीय दादांना समर्पित केली आहे. आदरणीय दादांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी अनेक वर्षे पूर्णपणे स्वतः ला समर्पित केले होते. आणि म्हणूनच आपण सुरुवातीलाच आदरणीय दादांसाठी समर्पणाची भूमिका घेतली होती.

राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केल्याचे पहायला मिळाले आणि तो आपल्या समोर आहे. दादांची कामाची पद्धत कुणालाही नवीन नव्हती. त्यांचा संघर्ष ही पाहिला आहे. दादांनी प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला प्राधान्य दिले. शेतकरी, कामगार, युवक, महिला, उद्योजक आणि वंचित घटकांना न्याय द्यावा त्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळाव्यात म्हणून दादांनी अहोरात्र प्रयत्न केले हे ज्ञात आहे.


राज्याला देशाच्या सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रत्येक घटकाचा सर्वांगिण विकास करण्याचा त्याचा मानस होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी देऊन संघटना अधिक रचनात्मक करण्याचा त्यांचा संकल्प होता. आणि हाच संकल्प आपणा सर्वांना पुढे न्यायचा आहे असेही सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

आदरणीय दादांनी पक्ष संघटना मजबूत करताना आणि कार्यकर्त्याना बळ देतानाच लोकहितासाठी अविरत कष्ट घेतले. पक्ष शिस्तीवर त्यांचा असलेला कटाक्ष निर्णयक्षमता नेतृत्व कार्यकर्त्यांवरील त्यांचा विश्वास आणि सर्वसामान्य जनतेच्याबाबत असलेली बांधिलकी ही दादांची कायमची शिदोरी आहे.

दादा आपल्यात नसले पण त्यांचे विचार त्यांची मुल्य आणि त्यांची कामाची पध्दत नेहमीच मार्गदर्शक ठरणार आहे. दादांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही आणि हे वास्तव आहे. परंतु त्यांचा विचार त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग आणि सामान्य माणसांबद्दल असलेली त्यांची बांधिलकी हिच आपल्या पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे.


दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एक कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात याची मला जाणीव आहे. आणि अभिमानसुध्दा आहे. याची जबाबदारी किती मोठी आहे हेही मला समजत आहे असेही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

तीन वर्षापूर्वी आदरणीय दादांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांना अवघा अडीच वर्षाचा कालावधी मिळाला. हा कालावधी मर्यादित असला तरी त्यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

दादांची ओळख केवळ राजकारणी, समाजकारणी म्हणूनच नव्हती तर सर्वसामान्यांसाठी आपल्या जीवाभावाचा माणूस… कामाचाच माणूस… आणि हक्काचा माणूस अशी होती.

राज्याचे अर्थमंत्री म्हणून दादांनी सादर केलेले त्यांचे अर्थसंकल्प हे राज्याच्या विकासाचे दस्तऐवज आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, उद्योग, सहकार, कृषी, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांसाठी काम केले. महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते आणि ते त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जपले याची आठवणही सुनेत्रा अजित पवार यांनी करुन दिली.

आज आपण सत्तेत आहोत. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात आपण लोककल्याणकारी निर्णय घेत आहोत. दादांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र हितासाठी राष्ट्रीय प्रवाहाशी जुळवून काम करत असताना महाराष्ट्र धर्माची लढाई कायम लढत राहिल याची ग्वाही देतानाच अल्पसंख्याक, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी समाजासह प्रत्येक समाजघटकाला सुरक्षित वाटेल अशी सामाजिक भावना रुजवणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

राजकारणाच्या नावाखाली जातीजातीमध्ये, धर्माधर्मात फारकत करणार्‍या प्रवृत्तींना राष्ट्रवादी काँग्रेस कधीच थारा देणार नाही. सर्व समाजघटकांनी गुण्यागोविंदाने नांदावे असा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी राजकीय तडजोड करावी लागली तरी आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, संघटना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नियोजनपूर्वक कामाला लागले पाहिजे. येणाऱ्या काळात मतदार पुनर्रचनेमुळे विशेषतः शहरी भागाची संख्या मोठ्याप्रमाणात वाढणार आहे.

त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी विशेष नियोजन आणि प्रभावी कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता असणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष पडताळणीत पक्षाच्यावतीने नियोजित केलेले बीएलए यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांशी समन्वय साधून अत्यंत अचूक आणि जबाबदारीने काम करावे.

मतदारयादी हा निवडणूक प्रक्रियेचा आत्मा आहे. आपल्या पक्षाचा एकही हक्काचा मतदार तांत्रिक कारणांमुळे किंवा दुर्लक्षामुळे वाया जाणार नाही यासाठी सर्व नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी गांभिर्याने लक्ष घालून ‘माझा बुथ माझा गाव’ या संकल्पनेत उतरून काम करावे अशा सूचना सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. बुथ पातळीवर प्रभावीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल त्यांना न्याय दिला जाईल याची ग्वाही सुध्दा सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा ऑक्सिजन आहे, पक्षाची खरी ताकद आहे. मोठया मोठया शहरातच नसते तर गावागावातील, गल्ली बोळातील कार्यकर्त्यांच्या कष्टात असते. आपण सगळ्यांनीच लोकसंग्रह वाढवणं लोकांच्या समस्या समजून घेणे व त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. संघटन मजबूत करण्यासाठी आजपासूनच कामाला लागले पाहिजे. गाव, वाडी, वस्ती, शहर आणि बुथ स्तरावर संघटन मजबूत केले पाहिजे. आपल्याला प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण केली पाहिजे असेही सांगितले.

पक्षात ज्येष्ठता सन्मान आवश्यक आहेच याचबरोबर नव्या पिढीला संधी देणे हेही महत्त्वाचे आहे. ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा याचा समतोल आणि समन्वय हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. ज्येष्ठांचा आदर, महिलांचा सन्मान, युवकांना आधार या त्रिसूत्रीनुसारच पक्षाची भविष्यात वाटचाल राहणार आहे हेही सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेल्या चार महिन्यांत मी ही जबाबदारी अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये घेतली.ही जबाबदारी घेत असताना नक्कीच येणार्‍या सर्वच गोष्टींची मला जाणीव आहे. पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत आहे.प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम माझ्या लक्षात आहे.

याचवेळी प्रत्येकाला न्याय मिळेल. याची खात्री देतानाच आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं… प्रत्येकाला समजून घेतलं… सावरून घेतलं दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना समजून घेतले. अनेकांचे हट्ट पुरवले प्रेम केले. मानसन्मान दिला. पदे दिली. जे हवे ते दिले. यापुढे पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल असा इशाराही दिला.

दादा पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते तसेच यापुढे कठोर निर्णय घेण्यास खरंतर माझ्या स्वभावानुसार जड जाईल पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रयत्न करणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वच सहकारी पक्षहिताच्या निर्णयास माझ्यासोबत कायम असतील आणि साथ देतील. प्रत्येकाने अधिक जागरूकपणे काम करण्याची अपेक्षा आहे. पक्षाची बदनामी होणार नाही याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांची आहे. विविध मंडळावर नियुक्त्या करताना पक्षनिष्ठा आणि पक्ष संघटन हे महत्वाचे निकष विचारात घेतले जातील. महामंडळासाठी पक्षाकडे अर्ज केले असतील त्यांचा नक्कीच विचार करु. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. पात्रता आणि गुणवत्ता तपासली जाईल. पक्षासाठी किती वर्षे काम केले त्यापेक्षा त्याकाळात पक्षाला किती पुढे नेले याचा नक्कीच विचार केला जाईल. काही वेळा तडजोडी कराव्या लागतात परंतु पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाने देशातील आजपर्यंतचे सर्वच विक्रम मोडलेले आहेत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बारामतीकरांचा मला खरोखर सार्थ अभिमान आहे. दादांनी बारामतीत उभ्या केलेल्या विकासाच्या डोंगरामुळे हे मला प्रचंड यश मिळाले आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या कामातून सिध्द करून दाखवेन असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

प्रत्येक निवडणुकीत मतदार यादी महत्त्वाची असून त्यादृष्टीने सर्वांनी काम करायचे आहे असे सांगतानाच बदलत्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात राष्ट्रवादी लक्ष घालत आला आहे मात्र ग्रामीण भागाची नाळ असलेला हा पक्ष असल्याने तितकेच शहरीकरण झालेले आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुंबई, पुणे, ठाणे शहरात बदल दिसत आहे. उद्याची निवडणूक शहरीकरणावर होणार आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात केले.

याच षण्मुखानंद सभागृहातून पक्षाचा जन्म झाला याची आठवण प्रफुल पटेल यांनी करुन दिली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस की देशमे अलग पहचान बनी आहे. पार्टी को पहिले चुनाव मे राष्ट्रीय पार्टी की पहचान मिली हे सांगतानाच अनेक राज्यात आपले आमदार, खासदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का व्याप पुरे देशमे बढा है… अरुणाचल और नागालॅंड और एक नया राज्य आणा चाहिए तो हम राष्ट्रीय पक्ष की फिर से मान्यता दिला सकते हैं. एक राज्य मे चार विधायक चुन के लायेंगे तो राष्ट्रीय पार्टी का दर्जा मिलेगा असेही प्रफुल पटेल म्हणाले.

आज आपल्यात दादा नाहीत. एक क्षण नाही की दादांची आठवण आली नाही. दादांनी जो विचार दिला त्या विचाराने वाटचाल करुया. त्यांची आठवण मनात ठेवत त्यांच्या विचारावर आपल्याला चालायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले.

नव्या पिढीला दादांचे योगदान कशापध्दतीचे होते हे माहित असायला हवे यासाठी दादांचा कार्याचा पट सुनिल तटकरे यांनी सांगितला.

२००४ मध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या त्यावेळी सर्वाधिक जागा त्याचा मुख्यमंत्री हे ठरवले गेले असते तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार सुनिल तटकरे यांनी केला. याशिवाय एक क्रमांकाचे स्थान कुणी हिरावून घेतले नसते. इतकं काम दादांनी केले होते हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

बुधवारी दिल्लीत एनडीएच्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो. यामागे दादांच्या त्यागाची भावना होती हे लक्षात घेतले पाहिजे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

सत्तेत सहभागी होऊया असे पत्र आमदारांनी शरद पवारांना दिले होते. त्या यादीत कुणाचे पहिले नाव होते याचा कागद शोधून काढा असे नाव न घेता सुनिल तटकरे यांनी टोला लगावला.

२ जुलैला दादांनी वेगळा निर्णय घेतला. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचार घेऊन एनडीएमध्ये सहभागी होण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला गेला. दादांनी अनेक विक्रम केले. चंद्र – सुर्य असेपर्यंत दादांनी आणलेल्या लाडकी बहीण योजनेला थांबवू शकत नाही. राज्यात या योजनेला लाडक्या बहिणींचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. टिका टिप्पणी होत राहिल पण जनमानसात आमचे स्थान आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

दादांच्या अकाली मृत्यू झाल्यानंतर दादांबद्दल देशभरात आत्मियता होती हे लक्षात आले. डोंगराएवढे दु:ख बाजूला ठेवून वहिनी तुम्ही पक्षासोबत उभे राहण्याचा निर्णय घेतलात. आज वहिनींच्या पाठिशी आपल्याला उभे राहायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या अव्वल स्थानासह बोनस गुणासहीत यश येत्या कालावधीत मिळवेल. यावेळी सुनिल तटकरे यांनी चतुरस्र कबड्डीचा खेळाडू म्हणून वय वर्षे ८० असलेल्या छगन भुजबळ यांच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळेच छगन भुजबळ तुम्हाला वहिनींच्या पाठिशी उभा राहण्याची गरज आहे. आमच्या संघाचे नेतृत्व वहिनी करत आहेत त्यामुळे आपला संघ आगामी काळात नक्कीच विजयी होणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

उद्याची वाटचाल योग्य पद्धतीने करायची आहे. दादांच्या प्रबळ विचाराने काम करायचे आहे. व्यक्तिगत विचार न करता पक्षाच्या भवितव्याचा विचार करून काम करा. दादांनी सर्व क्षेत्रात ठसा उमटवला तोच ठसा आपला प्राण असून त्याअनुषंगाने काम करण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले.

२२ जुलै रोजी दादांची जयंती असून ही जयंती राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात मोठया प्रमाणात साजरी करुया असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.

जनतेत नेहमीच जयघोष होणारा दादा आपल्यात नाही. त्यामुळे आपल्यावर फार मोठी जबाबदारी पडली आहे. आज संकल्प करावा लागणार आहे. आणि मग संघर्ष आणि नंतर दादांच्या प्रती समर्पण करावे लागणार आहे असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले.

ए – १० मधील बंगल्यात इतिहास घडला याची इत्थंभूत माहिती यावेळी भुजबळ यांनी सांगितली.
सफर मुश्कील था लेकीन… या शायरीतून छगन भुजबळ यांनी पक्षाचा खडतर प्रवास सांगितला.

आमचे बांधव पक्षासाठी सतत लढले. आमच्या पक्षात या अशा ऑफर दिल्या गेल्या परंतु फुले – शाहू – आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जाणार असल्याचे त्यांना सांगितले.

सर्व समाजांना न्याय देणारा सर्व समाजाला पुढे नेणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. अंकुर वाढत असताना वटवृक्ष केला त्या अजितदादांना खरे श्रेय जाते. दादांनी दिलेले योगदान शब्दात सांगणे कठिण आहे. आज संधी आहे त्या संधीच सोने करायचे की माती करायचे हे तुमच्या हातात आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राजकारण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे असे सांगितले होते. पक्षापेक्षा कुणी मोठे नाही. खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करु नका. पक्ष म्हणजे तुम्ही – आम्ही आणि कार्यकर्त्यांचा समूह म्हणजे पक्ष आहे. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आता काम करायचे आहे. मतभेद असू शकतात मनभेद नाहीत असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

पदे ही अळवावरचं पाणी असतं ते कधीच वितळून जाऊ शकते.
ना मंजिलसे डरेंगे… या शायरीतून छगन भुजबळ यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

राष्ट्रवादी काँग्रेस का झेंडा लेके चले थे और आखिरी तक लेके चलेंगे… हेही आवर्जून छगन भुजबळ यांनी सांगितले.

समर्पण… संघर्ष आणि संकल्प यासाठीच आहे की २७ वर्षात पक्षाला अनेकांचे योगदान लाभले आहे मात्र पक्षासाठी सर्वाधिक योगदान दादांचे आहे हे विसरता येणार नाही असे माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

सोन्याच्या अंगठीत हिरे घडवावे असे कार्यकर्ते दादांनी राष्ट्रवादीत घडवले आहेत. आणि आज ते राष्ट्रवादी पक्ष एक नंबरवर नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि तो आपण कराल कारण आपण दादांचे कार्यकर्ते आहोत असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

स्टेजवर १२ खेळाडू आहेत पण समोर बसलेले सर्व खरे खेळाडू आहेत. त्यांना ही मॅच खेळायची आहे. तुमच्या भावना मी इथे मांडल्या आहेत. सुर्यकुमार यादव ज्याने वर्ल्डकप जिंकून दिला त्याला आज बाहेर बसावे लागते पण जो १५ वर्षाचा खेळाडू सुर्यवंशी आहे त्याला संधी मिळाली आहे हे लक्षात ठेवायचे आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

दादांचे पुरोगामीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकल्प करा आणि वहिनींच्या नेतृत्वाखाली एक नंबरचा पक्ष करायचा आहे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदींनी आपले विचार मांडले.

यापूर्वी अजितदादा पवार यांच्या कार्यावरील चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार आणि आमदार यांचा सत्कार करण्यात आला. एसआयआरविषयी एक चित्रफीतही दाखवण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, युवा नेते खासदार पार्थ पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, युवा नेते जय पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, आदींसह पक्षाचे आमदार, खासदार, माजी मंत्री, देशभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. षण्मुखानंद सभागृह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुडुंब भरून गेले होते.

धोंडा खाल्ला अणि जीव गेला!

माजलंगाव,

Beed news Cat eats gold ring बातमी आहे धोंड्याची, म्हणजेच अधिक मास याला पुरुषोत्तम मास असेही म्हंटले जाते. या महिन्यात जावयाला धोंडा खायला बोलवितात. त्याचा सन्मान करतात, त्याला गोडधोड खायला घालतात,त्यांना पाची पोषाख करतात अणि पाठवणी करतात.


दर तीन वर्षाने  अधिकमास येतो.यंदा हा अधिक मास 15 जून पर्यंत असणार आहे.त्यासाठी गावागावात जावयाची गर्दी दिसत आहे.मुली माहेरपणाला आल्या आहेत. सासरे आपल्या जावयाची खिदमत करत आहेत. जावयाला सरप्राईज देण्याचा प्रयत्नात चक्क एका मांजरीला जीव गमवावा लागला.


किस्सा असा घडला की, बीड जिल्ह्यातील माजलंगाव जवळील एका वस्तीवर हा किस्सा घडला.जावयाला सोन्याची अंगठी द्यायची त्याची मस्करी करून. जेवणासाठी केलेल्या धोंड्यात ही पाच ग्राम  सोन्याची अंगठी लपवून ठेवली.

जावयाला सरप्राईज द्यायचे असल्याने ही अंगठी धोंड्यात ठेवली.जेवणावळीच्या गडबडीत स्वयंपाक घरातील मांजराने नेमका हाच धोंडा खाल्ला. सर्व धोंडे शोधले पण अंगठी मिळालीच नाही.

जावयाला मान द्यायचा राहून गेला.अंगठी गेली कुठे याचा शोध घेतल्यानंतर मांजराने धोंडा खाल्ल्याच लक्षात आले.

त्यासाठी मांजराला चार दिवस खोलीत कोंडून ठेवण्यात आले.तिच्या विष्ठातून अंगठी बाहेर पडेल, पण ते झाले नाही.या मांजरीला उलट्या होण्याचे औषध देण्यात आले.

पण त्यामुळेही अंगठी बाहेर पडलीच नाही, यामधे मात्र मांजराचा जीव गेला.त्यानंतर मांजरीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून काढण्यात आली.
धोंडा जावयाला, गम्मत सासूबाईंची अणि जीव गेला मांजराचा.यात अधिक मासा निमित्ताने पुण्य मिळाले की पाप तुम्हीच ठरवा.

neet ug 2026 paper leak update पुण्यातील तिसर्‍या महिलेला सीबीआई ने केली अटक

पुणे

neet ug 2026 paper leak update नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात आणखी एका मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.

फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक करणाऱ्या मनीषा संजय हवालदार नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

मनीषाने हवालदार या महिलेनं नीट यूजी परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केले होते.मनीषा हवालदार सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सर्फ प्रशाला येथे कार्यरत होती. सीबीआयने तिला पुण्यातून अटक केली आहे.

एनटीएने तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले होते. तिच्याकडे भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचू शकत होती. यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेसोबत मिळून तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते.

हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आल्याचे आढळले.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 3 मे रोजी नी यूजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून आता परीक्षा 21 जून रोजी होणार आहे.

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून करण्यात येत आहे. सीबीआयनं पेपरफुटीसंदर्भात चौकशी आणि अटकसत्र सुरु ठेवलं आहे. यात अकरावी अटक करण्यात आली आहे.

ही अटक पुण्यातून करण्यात आली असून पुण्यातून मनीषा हवालदार या महिलेला अटक करण्यात आलं आहे.

adhik maas,purushottam maas 2026 कुठे आहे भारतात पुरूषोत्तमाचे मंदिर?

बीड

अधिक मास म्हणजे तीन वर्षातून येणारा एक अधिक चा महिना. यंदा हा अधिक मास 17 मे ते 15 जून 2026 पर्यन्त आहे.या अधिक मासात जावयाला दान दिले जाते.याला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. या महिन्यात नागरिक पुरूषोत्तमाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात.

कुठे आहे भारतात पुरूषोत्तमाचे मंदिर?

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर प्रसिद्ध पुरुषोत्तमपुरी वसलेले आहे.प्राचीन पुरूषोत्तमाचे मंदिर येथे पाहावयास मिळते.गोदावरी नदी च्या किनार्‍यावर हे मंदिर आहे.अधिक मासा निमित्ताने मराठवाड्यातील भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात.

प्राचीन काळी विशेष म्हणजे भारतातील हे एकमेव मंदिर असून या धार्मिक स्थळाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की, पुर्वी शार्दुल नावाचा राक्षस पंचक्रोशीतील जनतेला त्रास देत होता.

भगवान विष्णु यांनी पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा शिरच्छेद केला व ते चक्र गोदावरीच्या पाण्यात धुतले, म्हणून आज देखील हे तीर्थ चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते. भाविक या चक्रतीर्थवर स्नान करतात व पशुधारी सावळ्याचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात.

बीड पुरुषोत्तम मास 2026 : पुरुषोत्तमाचे प्राचीन महत्व

या मंदिराशेजारीच त्रिवेणी संगम मंदिर आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे गणपती बाप्पा ची 4 फूटी उंचीची मुर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि महालक्षेक्ष्वराची महादेवाची पिंड असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात आहे. असा त्रिवेणी संगम तुम्हाला कुठे ही पाहायला मिळणार नाही. या गाभाऱ्याची प्रतिकृती वृंदावनातील कृष्ण मंदिरातील कृष्ण मंदिराची सारखी आहे. विशेष म्हणजे दोन्ही मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगणाऱ्या आहेत.

स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना नक्कीच पहाण्याजोगा आहे. असं म्हणतात की, इ.स.वी. 1310 मध्ये रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले. रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले. त्यामुळेच या मंदिराचं नाव ‘पुरुषोत्तम पुरी’ असं पडलं.

Purushottam Puri अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तमाच्या शासकीय महापूजा संपन्न

येथे अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तमाच्या शासकीय महापूजेचा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

भगवान पुरुषोत्तम देवस्थान हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून अधिक मासाला येथे विशेष धार्मिक महत्त्व आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय महापूजेला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आमदार प्रकाश सोळंके, एचडी गौरव इंगोले तसेच तहसीलदार संतोष रुईकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चारात भगवान पुरुषोत्तमाची महापूजा करण्यात आली.

यावेळी मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

मान्यवरांनी भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेत जिल्ह्यात सुख, समृद्धी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला.