राजकारण

राज्यातील लोकविरोधी महाभ्रष्टयुती सरकार विरोधात काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन: नाना पटोले

By admin

June 21, 2024

मुंबई,

State-wide ‘Mud Throw’ movement of Congress against the grand corrupt coalition government केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणा-या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने आज राज्यभरात चिखल फेको आंदोलन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. डीबीटी योजनेतून शेतकऱ्यांना किटकनाशके, स्प्रे पंप, खते, औषधे दिली जातात पण त्यात २७०० रुपयांच्या स्प्रे पंपची किंमत वाढवून ४५०० रुपये करण्यात आली इतर वस्तुही वाढीव दराने खरेदी करुन भ्रष्टाचार केला. या योजनेत बदल करायचा असल्यास कॅबिनेटची मंजुरी लागते असे कृषी आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले असता त्या कृषी आयुक्तांचीच बदली करण्यात आली. या योजनेतून ११ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ झाला असता पण भाजपा सरकारने भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. 

 केंद्र सरकारने काही पिकांची एमएसपी वाढवली पण या वाढीचा महागाईशी तुलना केली असती अत्यंत तुटपुंजी वाढ आहे. महागाईच्या दराप्रमाणे ही एमएसपी वाढ नाही. डिझेल, खते, बियाणे, शेती साहित्यांच्या वाढलेल्या किमती पहाता शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. राज्यात प्रचंड दुष्काळ आहे, शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्थ झाल्या आहेत पण सरकार मात्र दुष्काळसदृष्य परिस्थीती आहे म्हणून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन काँग्रेसने शेतकऱ्यांना आधार दिला. NEET परीक्षा रद्द करा, पोलीस भरती पुढे ढकला. भाजपाच्या राज्यात सातत्याने पेपरफुटी होत आहे. नीट परिक्षेतही पेपरफुटला असल्याने ही परिक्षाच रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. आधी पेपरफुटलाच नाही असे केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केले पण राहुल गांधी यींन पत्रकार परिषद घेतली तेंव्हा केंद्र सरकारला जाग आली. काँग्रेसने आज केलेल्या आंदोलनात नीट परीक्षा रद्द करावी अशी मागणीही केली आहे. तसेच राज्यात पाऊस सुरु असताना पोलीस भरती सुरु ठेवून भाजपा सरकार उमेदवारांच्या भवितव्याशी खेळत आहे. ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली असतानाही सरकार त्याकडे लक्ष देत नाही असेही नाना पटोले म्हणाले.  

*जामनेरची घटना संताप आणणारी..*

जामनेरमध्ये भिल्ल आदिवासी समाजातील सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या करण्यात आल्याने लोक संतप्त झाले. पोलीस स्टेशनवर हा समाज गेला असता शिंदे नावाच्या ठाणे अंमलदाराने या लोकांना हुसकावून लावले, मंत्र्याचा आशिर्वाद आहे मला कोणी काही करू शकत नाही असा उद्दामपणा केला. आता पोलीस या आदिवासी समाजालाच गोवण्याचा प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

 *ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांचाही आक्षेप..*

 ईव्हीएमवर जनतेचा विश्वास नाही त्यामुळे मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे अशी मागणी देशभरातून केली जात आहे. पण भाजपा सरकार मात्र ईव्हीएमवरच निवडणूका घेत आहे. विरोधी पक्षांचेही ईव्हीएम वर आक्षेप आहेत पण आता भाजपाच्या उमेदवारांचाही ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही. ईव्हीएमवर देशभरातून ८ उमेदवारांनी आक्षेप नोंदवला त्यात भाजपाचे तिघेजण आहेत. महाराष्ट्रातील डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपाचे उमेदवार आहेत. आतातरी भाजपा, केंद्र सरकार व निवडणुक आयोगाने गांभीर्य ओळखावे व मतपत्रिकेवर मतदान घ्यावे असेही नाना पटोले म्हणाले. 

 या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान उपस्थित होते.