State Chief Secretary Dr. Nitin Karir felicitated

ताज्या बातम्या

राज्याचे मुख्य सचिव डॉ नितीन करीर यांचा लोणीत सत्कार

By admin

March 10, 2024

लोणी,

State Chief Secretary Dr. Nitin Karir felicitated प्रवरेच्‍या मातीने विकासाची किंमत मोजताना समानतेचा दिलेला विवेक पुढे घेवून जाण्‍याचा महत्‍वपूर्ण संदेश राज्‍याचे मुख्‍य सचिव डॉ.नितीन करीर यांनी दिला. लोणी बुद्रूक ग्रामस्‍थांच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या सत्‍कार समारंभास उत्‍तर देताना जुन्‍या आठवणींना उजाळा देत डॉ.करीर यांनी प्रवरा परिसराच्‍या जडणघडणीचा इतिहासही उलगडून दाखविला.

राज्‍याच्‍या मुख्‍य सचिव पदावर नियुक्‍ती झाल्‍याबद्दल लोणीचे भूमीपुत्र आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे माजी विद्यार्थी या नात्‍याने लोणी ग्रामस्‍थांनी डॉ.नितीन करीर यांच्‍या नागरी सत्‍कार सोहळ्याचे आयोजन केले होते. ह.भ.प उध्‍दव महाराज मंडलिक यांच्‍या उपस्थितीत डॉ.करीर यांना मानपत्र, प्रभू श्रीरामचंद्रांची मुर्ती आणि पारंपारिक फेटा बांधून ग्रामस्‍थांनी सन्‍मानित केले. डॉ.करीर यांच्‍या उपस्थितीत लोणी खुर्द येथील व्‍यापारी संकुलाचे उद्घाटन तसेच लोणी बुद्रूक येथील विकसीत करण्‍यात येणा-या ग्रामसचिवालयाचे भूमीपुजन संपन्‍न झाले.

अहमदनगर-साबलखेड या 670 कोटीच्या कामाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या समारंभास महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, विभागीय आयुक्‍त राधाकृष्‍ण गमे, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, जेष्‍ठ नेते भाऊसाहेब विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, कैलास तांबे, डॉ.भास्‍करराव खर्डे, नंदू राठी, शिवाजीराव जोंधळे यांच्‍यासह करीर कुटूंबिय आणि मान्‍यवर पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या सत्‍काराला उत्‍तर देताना डॉ.नितीन करीर यांनी प्रवरा पब्लिक स्‍कुल मधील तसेच लोणी येथील वास्‍तव्‍यातील आठवणींना उजाळा देताना येथील शाळेने आम्‍हाला संस्‍कारा बरोबरच या परिसराने जगाच्‍या माहीतीचे आकलन आम्‍हाला करुन दिले. आज ज्या बालवाडीत मी गेलो त्‍या जागेवर आत मोठी इमारत उभी आहे. पण त्‍या बालवाडीची जागा कायम ठेवल्‍याचा आनंद मला झाला. यावरुन विकासाची किंमत मोजावी लागते हे या मातीने दाखवून दिले असा गौरवपुर्ण उल्‍लेख करुन डॉ.नितीन करीर म्‍हणाले की, समानतेचा विवेक या मातीने आम्‍हा सर्वांना दिला. हा विवेक पुढे घेवून जाण्‍यासाठी पुढच्‍या पिढीने काम करणे गरजेचे असल्‍याचे त्‍यांनी सुचित केले.

महात्‍मा गांधी यांनी दिलेल्‍या संदेशाचा उल्‍लेख करुन, मनाच्‍या खिडक्‍या उघड्या ठेवा, जगात जे चांगले आहे ते स्विकार आणि तुमच्‍यातील चांगले जगाला द्या हा विचार ठेवून पुढे जाण्‍याचे आवाहन करतानाच काय चांगले आहे आणि काय वाईट आहे हे नेहमी विवेक शिकवत असतो. संस्‍कृती आणि वेदाने सुध्‍दा विवेकच दिला. त्‍याची जोपासना करणे हे महत्‍वपूर्ण ठरणार आहे, असा सल्‍ला देतानाच प्रगती ही केवळ भौतीक नाही तर, मनाची आत्म्याची सुध्‍दा तितकीच महत्‍वाची असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

या परिसरा विषयी असलेली आत्‍मि‍यता आणि कृतज्ञता म्‍हणून आई वडीलांच्‍या स्‍मरणार्थ डिजीटल ग्रंथालय सुरु करणार असल्‍याची ग्‍वाही देवून या ग्रंथालयाचे काम एक दोन महिन्‍यात सुरु हाईल असे त्‍यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांसाठी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्‍पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र सुरु करण्‍याची व्‍यक्‍त केलेली इच्‍छा मी निश्चित पुर्ण करेल अशी ग्वाही त्‍यांनी दिली.

ना.विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात डॉ.करीर यांच्‍या कार्याचा गौरव करुन, खडतर परिस्थितीचा कुठलाही अडसर येवू न देता त्‍यांनी उचित ध्‍येय साध्‍य केले. प्रशासनातील एक दांडगा अनुभव असणारा सनदी आधिकारी आज राज्‍याच्या सर्वौच्‍च पदावर विराजमान झाल्‍याने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचा गौरव झाला आहेच, पण यापेक्षाही पद्मश्री डॉ.विखे पाटील यांनी जे स्‍वप्‍न पाहीले होते ते डॉक्‍टर करीर यांच्‍या रुपाने सत्‍यात उतरले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

ह.भ.प उध्‍दव महाराज मंडलिक यांनी डॉक्‍टर करीर यांचे व्‍यक्तिमत्‍व प्रवरेच्‍या भूमीतुन घडले याचे एकमेव कारण पद्मश्री डॉ.विखे पाटील आणि खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी जगाचे ज्ञान देणा-या संस्‍था निर्माण केल्‍या. त्‍या संस्‍थेतून घडलेली व्‍यक्तिमत्‍व आज नावलौकीक साध्‍य करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी डॉ.करीर यांचा प्रशासनातील अनुभव हा खुप मोठा आहे. आजपर्यंतच्‍या वाटचालीत अतिशय पारदर्शीपणे राहीलेली त्‍यांची कार्यपध्‍दती ही प्रवरा परिसराला सुध्‍दा भूषणावह असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ.भास्‍करराव खर्डे पाटील यांनी केले, प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर यांनी मानपत्राचे वाचन केले.