Sri Saibaba Sansthan Gurupurnima Festival 2024

ताज्या बातम्या

श्री साईबाबा संस्‍थान गुरूपौर्णिमा उत्‍सव 2024

By admin

July 17, 2024

शिर्डी-

Sri Saibaba Sansthan Gurupurnima Festival 2024 श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक २० जुलै २०२४ ते सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ या काळात गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा होत असून, या उत्‍सवात सर्व साईभक्‍तांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी केली आहे. 

श्री. गोरक्ष गाडीलकर म्‍हणाले की, गुरूशिष्‍य परंपरा फार प्राचीन आहे. आपल्‍या गुरु बद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी आषाढी पौर्णिमा म्‍हणून साजरी केली जाते. श्री  साईबाबा हयातीत असलेपासुन गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठया उत्‍साहात साजरी केली जात आहे. त्‍यामुळे या दिवसाला आजही अनन्‍य साधारण महत्‍व आहे. श्री साईबाबांवर श्रध्‍दा असणारे असंख्‍य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन समाधीचे दर्शन घेतात व या उत्‍सवास हजेरी लावतात.shirdi guru pornima date 2024 याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्‍सवा निमित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून, उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी शनिवार दिनांक २० जुलै पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकाड आरती, ०५.४५ वाजता श्रींचे फोटो व पोथीची मिरवणुक, ०६.०० वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत पद्मश्री मदन चव्‍हाण, रायपुर, छत्‍तीसगड यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत भुवनेश नैथानी, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत ह.भ.प.श्री मंदार व्‍यास, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम, सायंकाळी ०७.०० वा. श्रींची धुपारती,  ७.३० ते रात्रौ ९.३० या वेळेत श्री प्रशांत भालेकर, मुंबई यांचा स्‍वरधुनी साईगीतांचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार असून, पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.  

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार दिनांक २१ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०१.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत संजीव कुमार, पुणे यांचा भजनसंध्‍या  कार्यक्रम,  सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.श्री संतोष पित्रे, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. ७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री नीरज शर्मा, दिल्‍ली यांचा भजन संध्‍याचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दिनांक २२ जुलै रोजीची पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.

उत्सवाच्या सांगता दिनी सोमवार दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० ते १२.०० वाजता या वेळेत ह.भ.प.श्री वैभव ओक, डोंबिवली यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० चे दरम्‍यान श्रींची माध्यान्ह आरती होणार असून दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्रीमती वनिता बजाज, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम होणार आहे. दुपारी ०४.०० ते ०६.०० या वेळेत श्री विरेंद्रकुमार, साई ब्रदर्स, प्रयागराज यांचा मनोहारी भक्‍तीमय भजनांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री. ग्‍यानेश वर्मा, मुंबई यांचा साईराम गुणगान कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.

उत्सवाच्या निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्री साईसच्चरिताच्या अखंड पारायणासाठी जे साईभक्त इच्छुक आहेत, त्यांनी आपली नावे दिनांक १९ जुलै २०२४ रोजी दुपारी ०१.०० ते सायंकाळी ०५.३० यावेळेत समाधी मंदिरासमोरील देणगी काऊंटर नंबर ०१ वर नोंदवावीत. सोडत पध्दतीने पारायणासाठी भक्तांची नावे त्‍याच दिवशी सायंकाळी ०५.३५ वाजता समाधी मंदिर स्‍टेज येथे चिठ्ठ्या काढून पारायण करणा-यांची निवड करण्यात येईल. तसेच दिनांक २१ जुलै  रोजी होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे अनाऊसमेंट कक्षामध्‍ये मंदिर कर्मचा-यांकडे आगाऊ नोंदवावीत, असे ही श्री.गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. 

यावर्षाचा हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मा.जिल्‍हा न्‍यायाधिश, अहमदनगर तथा समिती अध्यक्ष मा.सुधाकर यार्लगड्डा, मा.जिल्‍हाधिकारी तथा समिती सदस्‍य श्री.सिध्‍दाराम सालीमठ व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली        उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.