प्रादेशिक वृत्त

या जिल्ह्यात सापडला पाण्यावर तरंगणारा दगड

By admin

March 07, 2023

सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ दगड सतीश लळीत यांची माहिती

 

भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभु म्हणाले ‘दुर्मिळ’

 

सिंधुदुर्ग,

sindhudurg news :  असं म्हणतात कि रामायण काळात जो रामसेतू बांधला त्याचे दगड पाण्यावर तरंगणारे होते. आजच्या विज्ञान युगात आपल्यला हि गोष्ट पटत नाही. पण तुम्हाला पाण्यावर तरंगणारा दगड याच विज्ञानयुगात पाहायला मिळाला तर रामसेतूची गोष्ट आपल्याला खरी वाटू लागते. असाच एक पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड सिंधुदुर्ग जिल्हयात सापडलाय.

घुंगुरकाठी सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत याना वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनाऱ्यावर हा दगड सापडला. वैज्ञानिक भाषेत या दगडाला प्युमिस म्हणतात. जागतिक कीर्तीचे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांना हा दगड दाखवला असता त्यांनी देखील हा दगड दुर्मिळ असून हा ज्वालामुखी जन्य सच्छिद्र खडक असल्याचं सांगितलं. अशी माहिती सतीश लळीत यांनी दिली.

 

हा ‘प्युमिस’ दगड जगाच्या सर्व भागात विशेषत: समुद्रकिनारी आढळतो. इंडोनेशिया, जपान, न्युझीलंड, अफगाणिस्तान, सिरीया, इराण, रशिया, तुर्कस्तान, ग्रीस, इटली, हंगेरी, जर्मनी, आईसलँड, उत्तर व दक्षिण अमेरिका, केनिया, इथिओपिया, टांझानिया आदि देशांमध्ये हा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो. तरंगणारा असल्याने समुद्राच्या पाण्यातील प्रवाहामुळे तो पाण्यातून प्रवासही करतो. ज्या भागात जागृत ज्वालामुखींचे प्रमाण मोठे आहे, अशा अनेक देशांमध्ये याचा वापर औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. याच्यात काही प्रमाणात औषधी द्रव्येही असतात. त्यामुळे चीनसारख्या देशात हजारो वर्षे त्याचा औषधी वापर होत आहे. आंघोळ करताना अंग घासण्यासाठीही याचा वापर होतो. आपल्या किनारपट्टीवर मात्र तो अभावानेच सापडतो.