ऋषिकेश भास्कर सांगळे(शहर प्रतिनिधी)
श्रीगोंदा
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर तिच्याच प्रशिक्षण अकॅडमीतील प्रशिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आणि धमकावून शारीरिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार श्रीगोंदा शहरात उघडकीस आला आहे. संबंधित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर दबाव टाकून गर्भपात घडवून आणल्याचा आरोपही या प्रकरणात करण्यात आला असून, घटनेने शहरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून रनर्स अकॅडमीशी संबंधित प्रशिक्षक जावेद शेख (रा. जकातेनगर, श्रीगोंदा) याच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र गुन्हा नोंद होताच संबंधित आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंद्यातील एका प्रशिक्षण अकॅडमीमध्ये पोलीस व सैन्य भरतीसाठी सराव करणारी ही महाविद्यालयीन तरुणी आरोपीकडे प्रशिक्षण घेत होती. डिसेंबर २०२४ दरम्यान प्रशिक्षणादरम्यान तिला शारीरिक दुखापत झाल्यानंतर उपचारासंदर्भात तिने प्रशिक्षकाकडे मार्गदर्शन मागितले. त्यावेळी आरोपीने तिला पहाटेच्या सुमारास एका क्रीडा संकुलाच्या परिसरात बोलावून स्ट्रेचिंगच्या बहाण्याने गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, या घटनेनंतर पीडितेला धमकावून गप्प ठेवण्यात आले. प्रकार उघड झाल्यास बदनामी व जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने वारंवार शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. याच काळात तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर दबाव टाकून गर्भपात घडवून आणण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती समोर येताच श्रीगोंदा शहरात संतापाची लाट उसळली आहे. विविध सामाजिक व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपीला अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणात आणखी पीडित असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, अशा कोणत्याही पीडितांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच आरोपीला राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात आला असून याबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित प्रशिक्षकाविरोधात बलात्कार, धमकी, फसवणूक व इतर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, अकॅडमीच्या कार्यपद्धतीचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे..