ऋषिकेश भास्कर सांगळेश्रीगोंदा (प्रतिनिधी) –
श्रीगोंदा–पेडगाव रोड परिसरात कथितपणे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसाय तसेच अमली पदार्थांच्या विक्री विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी सांगितले की, या बाबत वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास तक्रारी व निवेदने देण्यात आली असूनही अपेक्षित व ठोस कारवाई झालेली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
कापसे वस्ती, सोनवणे नगर, सावंत नगर, लोखंडे मळा आणि रसाळ वस्ती या परिसरातील नागरिकांना या कथित अवैध व्यवसायामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
या भागात वेश्या व्यवसाया सोबतच गांजा, नशेची इंजेक्शन्स व इतर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढीवर व शाळकरी विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
पेडगाव हे छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसांशी संबंधित गाव असून त्या दिशेने जाणारा हा मुख्य मार्ग आहे. अशा पार्श्वभूमीवर या भागातील कथित अवैध व्यवसाय सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाला बाधा आणणारे असल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.
यापूर्वी २०२४ मध्ये प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली होती. मात्र संबंधित व्यक्ती जामिनावर मुक्त झाल्यानंतर पुन्हा असे व्यवसाय सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२५ जानेवारी २०२६ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी कोणतीही ठोस बाब निष्पन्न झाली नसल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान, अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणी मागितल्याचे खोटे आरोप करून दबाव व धमकी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोपही करण्यात आले. मात्र अशा प्रकारच्या दबावाला भीक न घालता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील, असे अरविंद कापसे यांनी स्पष्ट केले.
येत्या १५ दिवसांत श्रीगोंदा शहर व परिसरातील सर्व कथित अवैध व्यवसायांविरोधात व्यापक जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
या वेळी विलास रसाळ (माजी सरपंच), भाऊ लोखंडे, गोरख लोखंडे, राहुल शिंदे, उत्तम लोखंडे, विशाल सावंत, किशोर सावंत, रमन सोनवणे तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत :- सदर बातमी ही पत्रकार परिषदेत मांडलेल्या माहिती व आरोपांवर आधारित आहे. संबंधित प्रकरण तपासाधीन असून कोणालाही दोषी ठरवण्याचा उद्देश नाही.