ताज्या बातम्या

२० लाखांची खंडणी मागणी करणारे आरोपी गजाआड; श्रीगोंदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

By admin

January 16, 2026

ऋषिकेश भास्कर सांगळेशहर प्रतिनिधी, श्रीगोंदा

श्रीगोंदा – १६ जानेवारी २०२६

Shrigonda cyber crime सोशल मीडियावरून धमकावत खासगी फोटो प्रसारित करण्याची भीती दाखवून लाखोंची खंडणी उकळण्याचा प्रकार श्रीगोंद्यात उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात सुमारे ५४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून, आरोपींना न्यायालयाने २० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार वैभव आसाराम खेडके (वय २७, रा. श्रीगोंदा) यांना १ जानेवारी २०२६ पासून एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपद्वारे धमकीचे संदेश येऊ लागले. आरोपींकडून वैयक्तिक स्वरूपाचे फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

धमक्यांमुळे घाबरलेल्या वैभव आसाराम खेडकें यांनी सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र उर्वरित रक्कम न मिळाल्याने आरोपींनी अधिक आक्रमक भूमिका घेत, “तू आमची फसवणूक केली आहेस, आता तुला किंवा तुझ्या कुटुंबातील कोणालाही जिवंत सोडणार नाही,” अशी गंभीर धमकी दिली. अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. सायबर सेलच्या सहाय्याने करण्यात आलेल्या तांत्रिक तपासातून संशयिताचा माग काढत आकाश पोपट मोरे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या गुन्ह्यात त्याचे साथीदार आकाश पोपट मोरे (वय २४, रा. टाकळी लोणार), बापू विठ्ठल शिंदे (वय ३१) आणि किरण विठ्ठल शिंदे (वय २९, दोघेही रा. वडाळी रोड, श्रीगोंदा) यांची नावे समोर आली.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले ३ मोबाईल फोन आणि ३ चारचाकी वाहने जप्त केली असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५४ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात आणखी आरोपी किंवा साधनसामग्री समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पो.नि. किरण शिंदे यांच्यासह गहिनीनाथ यादव, महादेव कोहक, अरुण पवार, सचिन वारे, विवेक दळवी, मयुर तोरडमल, तसेच सायबर सेलचे राहुल गुंडू आणि नितीन शिंदे यांनी सहभाग घेतला.

(स्रोत : पोलीस प्रसिद्धी पत्रकावर आधारित)