भारतीय स्टेट बँकेच्या वतीने जिल्ह्यातील बचत गटांना ५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य
नगर
Sbiahmednagar small saving loan देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक देशाच्या विकासासाठी काम करत आहे. चंद्रावर जाऊन भारत आता मोठी प्रगती करत आहे. यात महिलांचा मोठा सहभाग आहे.
नारीशक्तीमध्ये खूप क्षमता आहे. महिलांची प्रगती झाली तर देश आपोआप प्रगती करेल. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक करोड महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प केला आहे.
त्यासाठी भारतीय स्टेट बँक महिलांना प्राधान्याने पाठबळ देत त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करत आहेत. याचा जास्तीत जास्त लाभ महिलांनी घ्यावा. नगर मधील बचत गट उत्कृष्ट काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी स्टेट बँक खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँकेचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य महाप्रबंधक अरविंदकुमार सिंघ यांनी केले.
भारतीय स्टेट बँकेच्या नगरच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील महिला व पुरुष बचत गटांना मंजूर झालेल्या अर्थसहाय्याच्या धनादेशांचे वितरण बँकेचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य महाप्रबंधक अरविंदकुमार सिंघ यांच्या हस्ते झाले. एमआयडीसी येथील क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास बँकेचे औरंगाबाद विभागाचे उप महाप्रबंधक जितेंद्र ठाकूर, नगरच्या क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सूर्या पांडे यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील विविध महिला व पुरुष बचत गटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बचत गटांच्या महिलांनी स्वतः बनवलेली लाकडी बैलगाड्या देवून उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. यावेळी जिल्ह्यातील विविध बचत गटांना दीड ते २० लाख रुपये असे सुमारे ५ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
उप महाप्रबंधक जितेंद्र ठाकूर म्हणाले, बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वतःची व घराची प्रगती साधावी. देशातील मोठ्या उद्योजकांना टक्कर देण्यासाठी तुम्ही मोठे उद्योजक व्हावेत यासठी पूर्ण स्टेट बँकेचे पाठबळ तुमच्या मागे आहे.
भारताचा आत्मा ग्रामीण भागातच आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी तुमच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत. सर्व बचत गटांना स्टेट बँकेशी जोडावे, बँक सर्व गटांना सहकार्य करणार आहे.
खाजगी बँकां प्रमाणे केवळ नफा कमवणे हा स्टेट बँकेचा उद्येश नसून देशाच्या विकासात स्टेट बँक मोठे योगदान देत आहे.
क्षेत्रीय व्यवस्थापक सूर्या पांडे म्हणाले, ग्रामीण भागातील महिला आपल्या व आपल्या परिवारासाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येवून बचत गट चालवत असल्याचे पाहून आनंद होत आहे.
भारतीय स्टेट बँक लाखो करोडो रुपयांचे कर्ज वितरीत करत आहे. मात्र बचत गटांना केलेले सहकार्य हे सर्वात समाधान कारक आहे. बचत गटांच्या महिलांनी अजून मोठे उद्योग सुरू करावेत. नगरच्या शाखांमार्फत त्यांना पूर्णपणे सहकार्य होईल.
येथील बचत गट भारतात एक नंबरचे व्हावेत यासाठी नगरची स्टेट बँक त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असून सर्व प्रकारचे सहकार्य करेल. प्रामाणिकपणे काम करून वेळेत परतफेड करा.
प्रास्ताविकात स्टेट बँकेचे उप व्यवस्थापक (कृषी) धनाजी भागवत यांनी बचत गटांच्या कर्ज प्रकारणां विषयी माहिती दिली. स्टेट बँक ऑफिसर्स अससोसिएशनचे कोषाध्यक्ष वैभव कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता अडसूरे यांनी केले.
बँकेचे अधिकारी स्वप्नील कैवाडे, पद्माकर धकाते, अमृता गर्जे, अंकिता चव्हाण, अरुंधती पुजारी, प्रफुल वाघमारे व सर्व शाखेचे शाखाधिकारी, कृषी अधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन केले.
यावेळी एका बचत गटाच्या सदस्या अनिता आवरी यांनी आपल्या भाषातून स्टेट बँकेने केलेल्या सहकार्यामुळे आमचा बचत गट मोठी प्रगती करत आहे. शून्यातून सुरवात करून आज लाखो रुपयांचे सहकार्य बँकेने केले आहे. त्यामुळे मर्सिडिज गाडी घेण्याचे माझे स्वप्न भारतीय स्टेट बँकेमुळे पूर्ण होईल असे सांगताच टाळ्यांचा वर्षाव झाला.