आष्टी | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कडा येथील श्री संत मदन महाराज संस्थानच्या पारंपरिक पायी दिंडीचे बुधवारी पंढरपूरकडे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. “ज्ञानबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “माऊली… माऊली…” या अखंड नामघोषाने संपूर्ण कडा नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने हजारो वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारीला सुरुवात केली.
पालखी रथाची विधिवत पूजा, मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
दिंडी प्रस्थानापूर्वी श्री संत मदन महाराज मठासमोर पालखी रथाची विधिवत पूजा, आरती आणि अभिषेक संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून पालखी रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून, औक्षण करून आणि फुलांची उधळण करत दिंडीचे स्वागत केले. संपूर्ण परिसर विठ्ठलनाम आणि भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला.
चांगल्या पावसासाठी आणि राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठ्ठलचरणी प्रार्थना
यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या चरणी राज्यात भरघोस पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शिवारात समृद्धी यावी आणि सर्वांच्या जीवनात सुख-शांती नांदावी, अशी प्रार्थना केली. “वारी म्हणजे भक्ती, समता, सेवा आणि संस्कारांचा महामेळा” याचा प्रत्यय संपूर्ण सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था
दरवर्षीप्रमाणे कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी आणि बबलुशेठ तांबोळी यांच्या वतीने दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांचा सत्कारही करण्यात आला.
दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, सरपंच युवराज पाटील, उपसरपंच दीपक कर्डिले, हेमंत पोखर्णा, माजी सभापती संजय ढोबळे, राजाबापू कर्डिले, बाळासाहेब कर्डिले, ग्रामपंचायत सदस्य, माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, पत्रकार उत्तम बोडखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, महिला, युवक आणि वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेरी बु. येथे महाप्रसादाची व्यवस्था
वारी ही सेवा, समर्पण आणि सहकार्याची परंपरा असल्याचे दर्शन या प्रवासात घडले. शेरी बु. येथे पांडुरंग नाथ यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
वारकरी सेवा अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर
दिंडी प्रस्थानाच्या निमित्ताने वारकरी सेवा उपक्रमांतर्गत वारकरी आणि भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात डॉ. सत्यजित विधाते, डॉ. शिवानी विधाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली.
पावसाळ्यातील पायी प्रवासामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांचा विचार करून वारकऱ्यांना आवश्यक वैद्यकीय तपासणी, प्रथमोपचार आणि मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे देवस्थान समिती आणि नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
23 जुलै रोजी पंढरपूरात आगमन
टाळ, मृदंग, वीणेचा नाद, भगव्या पताका, तुळशीच्या माळा, कपाळावरील गोपीचंदन आणि मुखी अखंड विठ्ठलनाम अशा भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करणारी श्री संत मदन महाराजांची पायी दिंडी 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत समाजाच्या सुख-समृद्धीसाठी, चांगल्या पावसासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.