PM in a group photograph with the National Awardee Teachers 2023, in New Delhi on September 04, 2023.

शिक्षण

पंतप्रधानांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 च्या विजेत्यांशी साधला संवाद

By admin

September 04, 2023

 

 

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2023

 

pm modi teachers day शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोक कल्याण मार्ग येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 च्या विजेत्यांशी संवाद साधला.  या संवादात 75 पुरस्कार विजेते सहभागी झाले होते.

देशातील युवा मनांच्या जडणघडणीसाठी शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. चांगल्या शिक्षकांचे महत्त्व तसेच देशाचे भवितव्य घडवण्यात ते कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तळागाळातील लोकांच्या  यशाबद्दल मुलांना अवगत  करून प्रेरित करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी  भर दिला.

आपला स्थानिक वारसा आणि इतिहासाबद्दल अभिमान बाळगा असे सांगत पंतप्रधानांनी  विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृतीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन शिक्षकांना केले. देशातील विविधतेचे सामर्थ्य अधोरेखित करून त्यांनी शिक्षकांना आपापल्या शाळांमध्ये देशातील विविध भागातील संस्कृती आणि विविधता साजरी करण्याची विनंती केली.

शिक्षक दिनी काळ्याफिती लावून वर्ग अध्यापन करावे:- बा.म.पवार

चांद्रयान-3 च्या  यशावर चर्चा करताना,  21 वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित शतक असल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  तरुणांना कौशल्य आणि भविष्यासाठी सज्ज करण्याचे महत्त्वही त्यांनी सांगितले.

पर्यावरण स्नेही  लाइफ अभियानाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी वापरा आणि फेका  संस्कृतीच्या विरोधात पुनर्वापराच्या महत्त्वावर चर्चा केली. अनेक शिक्षकांनीही पंतप्रधानांना त्यांच्या शाळांमध्ये होणाऱ्या स्वच्छताविषयक कार्यक्रमांची माहिती दिली. पंतप्रधानांनी शिक्षकांना त्यांच्या पूर्ण  कारकिर्दीत सतत शिकण्याचा आणि कौशल्ये वृद्धिंगत करण्याचा सल्ला दिला.

देशातील काही उत्कृष्ट शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे आणि आपल्या  वचनबद्धतेने  शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याबरोबरच  विद्यार्थ्यांचे जीवनही समृद्ध करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा उद्देश आहे. या वर्षी, पुरस्काराची व्याप्ती वाढवण्यात आली असून   शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे निवडलेल्या शिक्षकांसह आता उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास मंत्रालयाद्वारे निवडलेल्या शिक्षकांचा समावेश यात करण्यात आला आहे.