पंकजाताई मुंडे

ताज्या बातम्या

गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ना. पंकजाताई मुंडे भावूक

By admin

November 11, 2025

परळी वैजनाथ

pankaja munde vaidyanath sugar becomes onkar sugar वैद्यनाथ कारखाना हे माझं चौथं अपत्य आहे असं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी म्हणत असंत. हा कारखाना देताना माझ्या मनात प्रचंड वेदना झाल्या हे सांगताना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना गहिवरून आले. ओंकार कारखाना यंदा दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गळीतास आणावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

ओंकार (वैद्यनाथ) साखर कारखाना युनिट क्रमांक ८ चा द्वितीय बाॅयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगामाचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठया थाटात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. ओंकारचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, माजी आमदार केशवराव आंधळे, वैद्यनाथचे उपाध्यक्ष चंद्रकांत कराड, संचालक अजय मुंडे, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष विनोद सामत, रमेश कराड, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, सतीश मुंडे, राजेश गिते, माऊली मुंडे, सुरेश माने, योगेश्वरी शुगरचे चेअरमन रोहित देशमुख, वसंत राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी विधिवत पूजनाने गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याच्या वतीने त्यांचा बोत्रे पाटील यांनी पंकजाताईंचा सत्कार केला.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,वैद्यनाथा पेक्षाही ओंकाराची व्याप्ती मोठी आहे.ओंकार साखर कारखाना म्हणताना माझ्या मनात जराही चलबिचल होत नाही. बाबुराव बोत्रे पाटील यांच्यामुळे वैद्यनाथाचे ओंकार रूप होणे शक्य झाले, हा वैद्यनाथचा पुनर्जन्मच म्हणावा लागेल. ओंकार ग्रुपला वैद्यनाथ कारखाना चालवायला दिला याबद्दल मी समाधानी असून राज्यातील सगळ्या कारखान्यापेक्षा बोत्रे पाटील चांगलं काम करतील हा विश्वास आहे. हा कारखाना लोकनेते मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी चालू केला होता आणि तो देताना मला प्रचंड वेदना होत असल्याचे त्या म्हणाल्या हे सांगताना त्यांना गहिवरून आले होते.

मुंडे साहेबांच्या काळात जे कर्ज घेतलं होतं ते कोजन साठी घेतलं होतं ते वेळेवर न दिल्यामुळे त्याला भरपूर व्याज लागलं आणि कारखाना नुकसानीत गेला. एमएससी बँकेचे कर्ज राजकीय परिस्थितीमुळे मिळू दिले नाही नंतर इतर बँकांच्या कर्जामुळे कारखाना अडचणीत आला. त्यानंतर कारखान्यामध्ये दुर्दैवी अपघात झाला. नंतर कोरोनामुळे गोदामातली साखर विकली जाऊ शकली नाही ज्या दिवशी साखर विकली त्यादिवशी अकरा कोटी रुपये बँकेने सील केले.

मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे, स्वतःची पदरमोड करून, गहाण टाकून या कारखान्यासाठी मी पैसे उपलब्ध केले आणि कारखाना चालवला. सरकारकडे कमी व्याजदराने पैसे देण्याची विनंती केली मात्र ते मिळाले नाहीत. सरकारने इतर कारखान्यांना पैसे दिले मात्र माझ्या कारखान्याला दिले नाहीत. त्यानंतर बँकांनी जप्तीची कारवाई केली, बँकेने किंमत ठरवून कारखान्याचा लिलावही केला. बँका थांबायला तयार नसल्याने मी बँकेला सहकार्य करायचं ठरवलं त्यानंतर बोत्रे पाटलाला कारखाना दिला, तो देताना मला प्रचंड वेदना झाल्या पण शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेणे भाग पडले असं त्या म्हणाल्या.

कारखाना दहा लाख मे टन गाळप करणार

बोत्रे पाटील यांनी कारखान्यात बदल केले आहेत. कारखाना दुप्पट क्षमतेने चालणार आहे जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्यापेक्षा हा कारखाना जास्त दर देणार आहे. ओंकारच्या रूपाने कारखान्याचा पुनर्जन्म झाला असून त्याला आशीर्वाद द्या. कारखान्यातल्या चिमणीचा धूर म्हणजे मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे म्हणून कारखाना सुरू राहिला पाहिजे ही माझी भावना होती. ओंकार च्या मागून डोकावणाऱ्या वैद्यनाथ कारखान्याला जिवंत ठेवा.आम्ही सात लाख मॅट्रिक टनापर्यंत उसाचे गाळप केलेले होते. पण यंदा कारखान्याचे उद्दिष्ट दहा लाख मेट्रिक टन असल्याचेही पंकजाताई मुंडेंनी सांगितले.

कर्मचारी युनियनने केला पंकजाताईंचा सत्कार

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे पगार व इतर देणी ना. पंकजाताई मुंडे यांनी विशेष लक्ष घालून दिल्याबद्दल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विष्णू तांबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून आभार मानले. कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.