अहिल्यानगर | प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे २४ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या सुनिल साळवे यांच्या कुटुंबावरच्या हल्ल्याच्या गुन्ह्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या हल्ल्यात साळवे कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले होते.
🕵️♂️ गुन्ह्याची पार्श्वभूमी
२४ ऑगस्टच्या रात्री सुनिल साळवे यांच्या घरावर तलवारी, काठ्या आणि इतर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. ४८१/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम १०९, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९, तसेच आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात १२ आरोपी आणि २ अज्ञात व्यक्तींसह एकूण १४ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
🔎 निलेश घायवळवर ठोस पुरावे
या घटनेच्या तांत्रिक आणि सखोल तपासात नान्नज गुन्ह्यात निलेश घायवळचा थेट सहभाग असल्याचे पोलीसांना पुरावे मिळाले आहेत.निलेश घायवळ हा मुळचा सोनेगाव (ता. जामखेड) येथील असून, त्याच्यावर पुणे शहरात खून, खंडणी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
⚖️ तपासात नव्या घडामोडी
निलेश घायवळ आणि त्याचा साथीदार ऋषी गायकवाड यांनी सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर हल्ल्याचा कट रचला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात निलेश घायवळ आणि ऋषी गायकवाड या दोघांना प्रमुख आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
👮 तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
संपूर्ण तपास मा. सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) व मा. वैभव कलुबर्मे (अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण लोखंडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग) हे करत आहेत.