nashik division teacers constituency election temptations

विशेष वृत्त

मताला तगडा भाव, ओल्या पार्ट्यावर ताव,  आणि ‘ येवल्याच्या ‘ पैठणीकडे धाव

By admin

June 24, 2024

ज्ञानेश गवले

श्रीरामपूर

nashik division teacers constituency election temptations येत्या बुधवारी होणारी नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणुक रंगतदार होत असुन या निवडणुकीत मतदार असलेल्या शिक्षकांची होत असलेली चंगळ हा समाजात एक चर्चेचा विषय ठरला आहे .आदर्श पिढ्या घडविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनीच जर प्रलोभनाला बळी पडून आपला स्वाभिमान विकला तर येणाऱ्या पिढ्यांनी कोणता आदर्श घ्यायचा? असा सवाल व्यक्त केला जात आहे.

खरं तर पदवीधर  आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका या अन्य निवडणुकांपेक्षा वेगळ्या असतात. कारण येथील मतदार हा बुद्धिजीवी, विचारी असतो (?) असे मानले जाते. म्हणुन या मतदारांकडून काहीतरी अनुकरणीय आदर्श समाजाला मिळणे अभिप्रेत असते.मात्र गेल्या पंधरा – वीस वर्षांपासून  कोणत्या तरी मार्गाने सरकारमध्ये सत्तेत जाण्यासाठी काही धनदांडग्या प्रवृत्तीं या निवडणुकीत उमेदवारी करीत असुन ते सर्रासपणे मतदारांना वेगवेगळ्या मार्गाने खरेदी करुन आपला हेतु साध्य करीत आहेत. दुर्दैवाने समाजव्यवस्थेचा कणा अशी अजुनही धारणा असलेला शिक्षक हा त्याला बळी पडत आहे हे चिंताजनक उघड वास्तव आहे.

निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसतशी शिक्षक मतदारांची धावपळ वाढली आहे. शाळा कॉलेजमध्ये शैक्षणिक चर्चेपेक्षा आज कोणाची कोठे पार्टी?, कोणाकडून किती भाव? कोणता उमेदवार कोणती भेटवस्तु देणार? याचीच चर्चा सुरु असल्याचे ऐकायला मिळते.

मागील निवडणुकीत शिक्षकांनी घेतलेल्या ओल्या पार्ट्या, पैठणी आणि  बंद पाकिटे यावर प्रसार आणि समाज माध्यमातून शिक्षक मतदारांवर सडकून टिका झाली होती. त्यातून काहीतरी बोध घेऊन सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र अर्थतुरांनां न सुखं ना निद्रा अशीच स्थिती यंदाही कायम आहे.

उमेदवारांच्या यंत्रणेतील बगलबच्चे तळागाळातील तळीराम शिक्षकांना हाताशी धरून मतदारांना धाबे – बारमध्ये नेऊन सर्रास ओल्या पार्ट्या देत आहेत. त्यामुळे सध्या हॉटेल आणि बारमध्ये मास्तरांचीच मोठी वर्दळ वाढली आहे.इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून चक्क पाण्याच्या जारमधुन मदिरा दिली जात आहे.या पार्ट्यामध्ये ओव्हरडोसमुळे काहींमध्ये बाचाबाचीही झाल्याची वार्ता आहे.तर काही जण झाकली मुठ… ठेऊन खाजगीत सुमडित कोंबडी करीत आहेत. तर ह्या ओल्या… भानगडीत नसलेले सवळ्यातले मतदार साध्या पद्धतीने आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे काहीजण सहकुटुंब हॉटेलात जाऊन हौस भागवून घेत आहे.

हा प्रकार केवळ जेवणावळींवरच थांबत नाही. तर प्रत्येक मताला बंद पाकीटातुन किमान चार अंकी भाव आजवर मिळत आहे. यंदा साखर कारखान्यांच्या निवडणुकांपेक्षा अधिक पाचअंकी  भाव मिळाला अशी चर्चा आहे. याखेरीज येवल्याची पैठणीही ठरल्याप्रमाणे घरोघरी दाखल झाली आहे. तर अन्य एका उमेदवाराकडून प्रत्येक मताला पार्टी,सरांना ड्रेस, मॅडमला साडी, नथनी , बंद पाकीट घर पोहोच होत असल्याचे कळते. त्यामुळे मतदाराची चंगळ आणि जोडी मतदार शिक्षकांची तर दिवाळीचं झाली आहे.

सातवा वेतन आयोगाचा लाखांच्या आसपास पगार घेणारा गुरुजन शिक्षक खुलेआम आपले संस्कार, स्वाभिमान  विकुन कोणाच्या ओल्या पार्ट्या, तगड्या भावात मतांची विक्री आणि पैठणी, ड्रेस व भेटवस्तुच्या अमिषाला बळी पडून मतदान करीत असेल तर त्यांच्या हाताखाली घडणाऱ्या पिढ्या कोणत्या वाटेने पुढे जातील  ? हा खरा प्रश्न आहे. यावर त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा समाजात शिल्लक असलेले थोडेफार स्थान आणि नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार गमवून बसावे लागले तर आश्चर्य वाटायला नको.

  लाख चुकले तरी चालतील, परंतु शिक्षक चुकता कामा नये.

ज्ञान, संस्कार, स्वाभिमान, नीतिमूल्ये यांसह आपलं सर्वस्व पणाला लावून समाज व राष्ट्राला अभिप्रेत असा सुसंस्कारित समृध्द आदर्श वारसा निर्माण करुन त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. ही ज्ञानपताका खांद्यावर घेऊन नैतिक मार्गाने जाताना अन्य कोणी चुकले तरी चालतील, पण संस्कारित पिढ्या घडविणारा शिक्षक मात्र चुकता कामा नये, अशी सकल जणांची रास्त अपेक्षा आहे.  यावर संबंधितांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

 अर्थात सारेच शिक्षक  मतदार यात सामील नाहीत. काही सुसंस्कारित शिक्षक  पेशाचे पावित्र्य जपुन  नीतिमूल्ये,स्वाभिमान आणि तत्वाने जगणारे काही शिक्षक मात्र या घृणास्पद प्रकारापासून दुर आहेत. परंतु त्यांची संख्या अत्यल्प असल्याने बिच्चारे सज्जन अत्यल्पमतात आणि दुर्जन बहुमतात अशी स्थिती असल्याने दुर्दैवाने गव्हाबरोबर किडेही रगडले जात आहेत.