मुंबई
mumbai 56th international physics olympiad ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड २०२६ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी पाच सुवर्णपदके पटकावली. कोलंबियाच्या बुकारामांगा येथे दिनांक ०५ ते १२ जुलै २०२६ कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारताच्या सर्व पाच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पाचही सुवर्णपदके पटकावली.
मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूरचा रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतील द्वारकाचा ऋषित गर्ग आणि गुजरातच्या अहमदाबादचा स्वरित जोशी यांना सुवर्ण पदके मिळाली. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र -टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे (HBCSE – TIFR) प्रा. अन्वेश मुझुमदार, मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ. लीना जोशी यांनी केले असून वैज्ञानिक निरीक्षक भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था कोलकाताचे प्रा. आनंदा दासगुप्ता आणि रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालय निशा केळकर होते.
या स्पर्धेत ८५ देशांतील एकूण ३८१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आयपीएचओमध्ये (IPhO) भारताने पाच सुवर्णपदके जिंकण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी २०१८ ला भारताने ही कामगिरी केली होती.
देशनिहाय पदकतालिकेत, भारत चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. सर्वसाधारण विजेत्यासाठीचा विशेष पुरस्कार दक्षिण कोरियाच्या एका विद्यार्थ्याला मिळाला; तर प्रायोगिक घटकातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार इराणच्या एका विद्यार्थ्याला मिळाला. एकूण ५१ सुवर्ण, ८० रौप्य आणि ९७ कांस्य पदके प्रदान करण्यात आली.
५ तासांच्या सैद्धांतिक स्पर्धेत पॅरामॅग्नेटिक कूलिंगचे थर्मोडायनामिक्स, कॉफी कपमध्ये परावर्तित होणाऱ्या प्रकाशातील कॉस्टिक्स आणि कस्प्स, ओझोनचे फोटोआयनीकरण आणि इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन जोड्यांची गतिशीलता यांसारख्या विविध विषयांवर आधारित तीन प्रश्न होते.
सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी सैद्धांतिक परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली, काहींनी तर जवळजवळ परिपूर्ण गुण मिळवले. प्रायोगिक स्पर्धा, जी देखील ५ तासांची होती, तिने विद्यार्थ्यांना द्रवांमधील थर्मोडायनामिक प्रक्रिया आणि उष्णता हस्तांतरणाशी संबंधित अनेक घटनांचा शोध घेण्याचे आव्हान दिले. भारतीय विद्यार्थ्यांनी प्रायोगिक घटकातही उल्लेखनीय कामगिरी केली. आयपीएचओमध्ये (IPhO) भारताचा हा २७ वा सहभाग होता.
या सर्व वर्षांमध्ये जवळपास ४४% भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके, ४१% विद्यार्थ्यांनी रौप्यपदके, १०% विद्यार्थ्यांनी कांस्यपदके आणि ५% विद्यार्थ्यांनी विशेष उल्लेखनीय पदके जिंकली आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये, आयपीएचओ (IPhO) मधील सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण (६२%) किंवा रौप्य (३८%) पदके जिंकली आहेत.