ताज्या बातम्या

महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि अम्मा असोसिएशनच्या संयुक्त संशोधनातील चार नवीन जैविक किडनाशकांच्या प्रजातींची नोंदणी – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

By admin

July 24, 2024

अहमदनगर –

mpkv Registration of four new biological pesticide species महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे देशामध्ये अग्रगन्य विद्यापीठ असून विद्यापीठ स्थापनेपासून या विद्यापीठामध्ये जैविक किडनाशकांच्या संशोधन, उत्पादन, प्रचार व प्रसार यासाठी विद्यापीठाने महत्वपुर्ण भुमिका बजावली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि अम्मा असोसिएशन, नाशिक यांच्यामध्ये जुलै, 2017 मध्ये जैविक किडनाशकांच्या संशोधन आणि नोंदणीसाठी सामंजस्य करार झाला होता.

या सामंजस्य करारामध्ये वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि किटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त संशोधनाव्दारे जैविक किडनाशकांची परिणामकारता, विषारीपणा व पर्यावरण पुरकता यावर संशोधनाअंती मिळालेली उपयुक्त माहिती केंद्रीय किटकनाशक मंडळ, फरीदाबाद यांच्याकडे नोंदणीसाठी सादर करण्यात आली.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवर प्रथमच ट्रायकोडर्मा व्हीरीडी, बॅसिलस सबस्टीलीस, ट्रायकोडर्मा हर्जीयानम, सुडोमोनस फ्लुरोसन्स या चार नवीन जैविक किडनाशकांच्या प्रजातीसाठी व उत्पादनासाठी नोंदणीस मान्यता मिळालेली आहे. या चार नवीन जैविक किडनाशकांच्या नवीन प्रजातींना नोंदणी समितीची एकाच वेळी मान्यता मिळणे हे देशात प्रथमच घडले आहे.

या संशोधीत व नोंदणीकृत जैविक किडनाशकांच्या प्रजातींमुळे शेतकर्यांना पिकावरील किड व रोगांच्या व्यवस्थापनासाठी तसेच नियंत्रणासाठी वापरण्यात येणार्या रासायनिक किडनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरणपुरक रोग व किडींचे व्यवस्थापन होवून अंशविरहीत शेती उत्पादन घेणे शक्य होणार आहे. जैविक किडनाशकांच्या वापरामुळे रासायनिक किडनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होणार आहे.

ही बाब शेतकर्यांच्या दृष्टीने फायदेशीर असून शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्वाचे ठरणार आहे.यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. याविषयी कुलगुरु यांनी विद्यापीठ शास्त्रज्ञांचे तसेच अम्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांचे अभिनंदन केले.

यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सात्ताप्पा खरबडे, वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले हे उपस्थित होते. या संशोधनात तत्कालीन वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी.डी. देवकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. किरणसिंह रघुवंशी, डॉ. संजय कोळसे आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. नारायण मुसमाडे यांचा सहभाग होता.

नवीन जैविक किडनाशकांच्या नोंदणीकामी महत्वाचा पाठपुरावा करुन नोंदणीसाठी अम्मा असोसिएशनचे सचिव डॉ. प्रशांत धारणकर आणि सर्व सदस्य यांनी मोलाची भुमिका निभावली आहे.