Mpkv Rahuri Tifan 2024

कृषीविषयक

राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफण-2024 चे महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजन

By admin

May 24, 2024

राहुरी विद्यापीठ

Mpkv Rahuri Tifan 2024 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तिफण-2024 या कृषि यंत्रे विकसीत करण्याच्या स्पर्धेचे महात्मा फुले कृषि विद्यापीठात दिनांक 25-26 मे, 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून या स्पर्धेचा विषय ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रे हा आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला यंत्र डिझाईन करून ते तयार करणे आणि प्रत्यक्षात शेतामध्ये चालवणे, त्याचा सविस्तर प्रस्ताव सादर करणे इ. कामे पूर्ण करावी लागतील. जिंकणार्या 3 संघास भरघोस रोख रक्क्म बक्षीस म्हणुन मिळणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी. आर. मेहता यांच्या हस्ते व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, कृषि अभियांत्रीकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कार्यक्रमाचे समन्वयक सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स इंडियाचे श्री. अजय अग्रवाल, कार्यक्रमाचे सहसमन्वयक कृषि यंत्रे आणि शक्ती विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे, सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्सचे अधिकारी उपस्थित असणार आहेत.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीची जबाबदारी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी यांचेकडे आहे.

सदर स्पर्धेसाठी विविध राज्यातील एकुण 54 अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघानी भाग घेतला होता. दोन प्राथमिक फेरीतून 28 महाविद्यालयांच्या संघाची अंतीम फेरीमध्ये निवड झालेली आहे. या अंतीम फेरीत एकुण 500 विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि 50 पेक्षा जास्त मार्गदर्शक सहभागी होणार आहेत.

तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृषि यंत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील 40 पंचांची नेमणूक करण्यात आलेले असून, कृषि यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रातील विविध कंपन्या आणि संस्थांचे 100 उच्चस्तरीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी दिली आहे.