कृषीविषयक

शेळीपालन हे शेतकर्‍यांसाठी ए.टी.एम. मशीनसारखे

By admin

August 14, 2024

शेळीपालन हे शेतकर् ‍यांसाठी ए.टी.एम. मशीनसारखे

– कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ , दि. 13 ऑगस्ट, 2024

      mpkv goat gallary विद्यापीठाच्या शेळी संशोधन प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेली गोट गॅलरी शेळी प्रकल्पाला भेट देणार्‍या शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. शेतकर्‍यांसाठी शेळीपालन हा सहजा सहजी करता येणारा व्यवसाय असुन गरज लागेल तेव्हा सहज पैसा हातात मिळवुन देणारे शेळीपालन हे शेतकर्‍यांसाठी ए.टी.एम. मशीन आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

      महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित शेळी संशोधन प्रकल्पामध्ये शेळ्यांच्या विविध जाती, वेगवेगळ्या व्यवस्थापन पध्दती, प्रजनन, आहार, पोषण, आरोग्य व्यवस्थापन, दुध, लेंडीचे मुल्यवर्धन तसेच शासकीय योजनांसाठी प्रकल्प अहवाल यांची आवश्यक असलेली माहिती छायाचित्रांसह शेतकर्‍यांना उपलब्ध होणेसाठी गोट गॅलरीची उभारणी करण्यात आली. या गोट गॅलरीचे उद्घाटन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, कृषि अभियांत्रिकी व आंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख, डॉ. मुकुंद शिंदे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार, शेळी संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णु नरवडे व सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे उपस्थित होते.

      यावेळी झालेल्या कार्यक्रमात शेळी संशोधन प्रकल्पाने तयार केलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाची पार्श्वभूमी व संकल्पना डॉ. विष्णु नरवडे यांनी विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संशोधन उपसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील यांनी केले. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे अधिकारी, विद्यार्थी व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.