घटनास्थळाला भेट देऊन घेतला आढावा : आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन
नागपूर
minister Nitin Gadkari visits Chamundi Explosive Company blast case केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी चामुंडी एक्सप्लोझिव कंपनीतील स्फोटामध्ये जीव गमावणाऱ्या मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर कोसळलेले संकट अत्यंत वेदनादायी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. धामणा येथे घटनास्थळी भेट देऊन ना. श्री. गडकरी यांनी आढावा देखील घेतला.
हिंगणा तालुक्यातील धामणा येथे चामुंडी एक्सप्लोजिव या स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत गुरुवारी (दि.१३ जून) झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला. तर आठ ते दहा कामगार जखमी झाले. ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (दि. १४ जून) घटनास्थळी भेट दिली. हिंगण्याचे आमदार समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, स्फोटके नियंत्रण विभागाचे अधिकारी तसेच इलेक्ट्रिक इन्सपेक्टर आदींची यावेळी उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी यांनी संबंधितांना स्फोटामागचे कारण जाणून घेतले. फॅक्टरीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्याची कुठली यंत्रणा आहे, यासंदर्भातही विचारणा केली. भविष्यात अशाप्रकारची घटना घडूच नये किंवा घडली तर त्यावर तातडीने नियंत्रण मिळविता येईल, यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले. मृतकांचे कुटुंबीय व गावकऱ्यांसोबत देखील ना. श्री. गडकरी यांनी संवाद साधला आणि आर्थिक मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचा विश्वास त्यांना दिला.