कंपनीतील ३० पैकी पाच कामगार जखमी
ठाणे
Massive fire due to explosion at Omega chemical company in Dombivli MIDC ठाणे जिल्हयातील डोंबिवलीतील महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) फेज दोन मधील ओमेगा या रसायनाच्या कंपनीमध्ये आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास दोन स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ३० पैकी पाच कामगार होरपळून जखमी झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं दिली.
या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, या स्फोटाचा आवाज सुमारे एक ते दीड किलो मीटरच्या परिसरात घुमला होता. स्फोटाच्या धमाक्यामुळं परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या भागात धूरांचे लोळ मोठया प्रमाणात पसरले आहेत. घटनास्थळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहा तर ठाणे महापालिकेच्या दोन अशा आठ अग्निशमन दलाच्या गाडया आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
यातील पाच जखमींपैकी दोघांना एका खासगी रुग्णालयात तर तिघांना डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या कंपनीत रसायनाची निर्मिती करतांना सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी केली की नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.
घटनास्थळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदींनी घटनास्थळी भेट देत आहेत. यापूर्वीही २०१६ मध्ये याच ठिकाणी रसायनाचा स्फोट झाला होता. यामध्ये १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.आजच्या घटनेमध्ये जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.