नागपूर, दि. 06
मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक प्रयत्न झाले. आज अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा ही टिकली पाहिजे. मायबोली मराठी ही वर्षानुवर्षे अभिजात होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्याचा इतिहास सर्वांपुढे यावा यासाठी तंजावर येथे मराठी भाषा भवन उभारणार असून दोन दिवसीय उपक्रम सुरू करणार असल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
वनमती येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आयोजित अभिजात मराठी भाषा दिन व अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार मंत्री श्री. सामंत आणि राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, ख्यातनाम कवी आणि पूर्वाध्यक्ष ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रा. वसंत आबाजी डहाके, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मराठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले की, मराठीबद्दल स्वाभिमान, निष्ठा असली पाहिजे. मराठी भाषा बोलता आली पाहिजे. अमराठी माणसांना मराठी शिकायची आहे यासाठी ॲप तयार करून 1 डिसेंबर सुरू करणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती स्थापन करणार आहे. मराठीतील दर्जेदार साहित्य हे जगभर पोहचण्याची गरज आहे. मराठी विश्वकोष मंडळाला सर्व सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले की, मराठीची सक्ती आणि भक्ती अनिवार्य आहे. मराठीत अनेक शब्द आहेत. शेतकरी कुटुंबातील एका मुलाला अध्यक्षपद मिळाले आहे. मराठी भाषेत शब्द आहेत, आशय आहेत. अनेक उत्तम कलाकृती यात असल्याचे ते म्हणाले. नव्या लेखकानी पुढे येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी साहित्यिक प्रा. वसंत आबाजी डहाके यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.