Mahatma Phule Agricultural University MoU for Green Hydrogen Production

कृषीविषयक

हरित हायड्रोजन निर्मितीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा सामंजस्य करार

By admin

June 14, 2024

राहुरी विद्यापीठ , दि. 14 जून, 2024

     Mahatma Phule Agricultural University MoU for Green Hydrogen Production महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) यांच्यामध्ये राज्यस्तरीय सहभागातून हरित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पासाठी नुकताच सामंजस्य करार कृषि महाविद्यालय, पुणे येथे करण्यात आला.

 याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (मेडा) उपसंचालक श्री. विजय कोते, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, प्रक्षेत्र संरचना व ग्रामीण विद्युतीकरण विभाग प्रमुख डॉ. वीरेंद्र बारई, डॉ. अनिल रुपनर तसेच कृषि महाविद्यालय, पुणे येथील सर्व विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते. 

याप्रसंगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की येणार्‍या काळात हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतावर आधारित ग्रीन हायड्रोजन अँड पावर जनरेशन फ्रॉम वेस्ट हा प्रकल्प विद्यापीठात पूर्ण केला जाणार आहे. हा प्रकल्प शेतकर्‍यांसाठी फायदेशीर असून त्यामुळे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल. या प्रकल्पासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन आयआयटी, मुंबईकडून घेतले जाणार आहे व आवश्यक खर्चासाठीचा निधी पुरवठा हा मेडा, पुणे यांच्याकडून होणार आहे. 

तसेच कृषि विद्यापीठ आणि आयआयटी, मुंबई यांच्याकडून संयुक्तपणे संशोधन, शैक्षणिक कार्यक्रम, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात परस्पर भेटी व परिसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी डॉ. दिलीप पवार यांनी सांगितले की या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कृषि अवशेष व शहरी घनकचरा यांच्यावर प्रक्रिया करून हायड्रोजन इंधन तयार केले जाईल व त्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व आभार डॉ. विरेंद्र बारई यांनी मानले.