ताज्या बातम्या

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी

By admin

July 02, 2024

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी

नाशिक-

Kishore Darade of Shiv Sena Shinde faction won in Nashik Teacher Constituency नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी अपेक्षित कोटा पूर्ण करून विजय मिळवला. दराडे यांनी विजय मिळवताच शिवसैनिकांनी जल्लोष केला.

विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची काल सकाळी 8 वाजता सुरू झालेली मत मोजणी तब्बल 12 तासांनी संपली. या निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती 26 हजार 476 मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19 व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 32 हजार 309 मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.नाशिक शिक्षक मतदार संघातून दराडे निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली आणि त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात झालेल्या मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली.

यामध्ये 19 व्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे आणि अहमदनगर येथील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. 19 व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली. श्री दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे यांना तिसऱ्या फेरी अखेर 17 हजार 393 मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची 6 हजार 72 मते पडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या हिताचे घेतलेले निर्णय निवडणूकीत महत्त्वाचे ठरले तसेच यापुढे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.