मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे पर्शियन आखातातील समुद्री वाहतूक आणि भारताशी संबंधित व्यापाराला मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. Strait of Hormuz News Marathi
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) भारतीय जहाजांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्याची परवानगी दिली आहे.
जगातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा समुद्री मार्ग पर्शियन आखात आणि ओमान यांना जोडतो. दररोज जगातील मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची वाहतूक या सामुद्रधुनीतून केली जाते. त्यामुळे या भागातील तणावाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता असते.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या नौदलाने स्पष्ट केले आहे की, या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांनी आधी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेता मार्गक्रमण करणाऱ्या जहाजांवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, भारताच्या जहाजवाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या पर्शियन आखात परिसरात २८ भारतीय ध्वज असलेली जहाजे कार्यरत आहेत. त्यापैकी २४ जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात असून त्यावर सुमारे ६७७ भारतीय खलाशी आहेत, तर चार जहाजे पूर्व भागात असून त्यावर १०१ भारतीय खलाशी कार्यरत आहेत.
अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांनंतर या भागातील तणाव वाढला असून समुद्री वाहतूकही प्रभावित झाली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचा इराणचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.