श्रीगोंदा

ताज्या बातम्या

BREAKING | श्रीगोंदा सिस्पे प्रकरणातील हलगर्जीपणा : पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर कारवाईची विधानसभेत थेट मागणी.

By admin

December 14, 2025

ऋषिकेश भास्कर सांगळेश्रीगोंदा शहर प्रतिनिधी

श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी सिस्पे या आर्थिक फसवणूक प्रकरणात गंभीर स्वरूपाचे कलम ३१६ न लावल्यामुळे आरोपींना तत्काळ जामीन मिळाल्याचा आरोप होत असून, या प्रकरणासह इतर आर्थिक फसवणूक प्रकरणांतील कथित हलगर्जीपणाबाबत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी ठोस मागणी श्रीरामपूरचे आमदार तथा मूळचे पेडगाव ( ता. श्रीगोंदा ) येथील रहिवासी आ. हेमंत ओगले यांनी थेट विधानसभेत केली आहे.

या मुद्द्यामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आमदार ओगले यांनी विधानसभेत पोलिस निरीक्षकांवर कारवाईची मागणी केल्याने, श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः सिस्पेसारख्या गंभीर आर्थिक फसवणूक प्रकरणातील तपासात झालेल्या कथित दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

➡️ कायम वादाच्या भोवऱ्यात पोलिस निरीक्षक –

पदभार स्वीकारल्यापासून पोलिस निरीक्षक किरण शिंदे हे सतत विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत.पोलिस ठाण्यात साजरा करण्यात आलेला वाढदिवस, काही महिन्यांच्या कालावधीतच दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, तसेच सिस्पेसारख्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील तपासावर झालेले आरोप – या सर्व बाबींमुळे त्यांच्या कार्यकाळावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

➡️ कारवाई होणार की पाठीशी घालणार?

आ. हेमंत ओगले यांनी हा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित केल्याने तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, आता खरोखरच पोलिस निरीक्षकांवर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.