ताज्या बातम्या

बीड जिल्ह्यातील भाविकांसाठी खुशखबर.आता बीडहुन अयोध्या प्रयागराज अन काशीला एसटी बस.

By admin

February 07, 2024

बीड

Beed ayodhya bus गेल्या अनेक वर्षांपासून प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची ओढ असणाऱ्या बीड जिल्ह्यातील भाविकांसाठी आता एसटी महामंडळाने खुशखबर दिलीय. प्रभू रामाच्या भाविकांची वाढती संख्या पाहून, राज्य परिवहन महामंडळाने ‘अयोध्या दर्शन’ यात्रेचे आयोजन केले आहे. यामुळे भाविकांना आता बीडहून एसटी बसने थेट अयोध्या, प्रयागराज आणि काशीला जाता येणार आहे.विशेष म्हणजे अयोध्येपासून काशी, प्रयागराज ही देवस्थानेदेखील जवळच आहेत. तसेच या देवस्थानाविषयी भाविकांची देखील आस्था आहे. यामुळे एकाच प्रवासात भाविकांना तीन देवस्थानांचे दर्शन करता येणार आहे.

या तिन्ही दर्शनासाठी भाविकांना साध्या बससाठी 5 हजार 100, आसन शयनयानसाठी 6 हजार 900 तर शयनयान बससाठी 7 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर आसन क्षमतेनुसार एकत्रित प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यास मागणीनुसार बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवासासाठी सुसज्ज आणि नवीन बस वापरण्यात येणार असल्याचे विभागीय कार्यालयाने सांगितले. यामुळे भाविकांना आता 5 हजार रुपयांपासून देवदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

आणखी वाचा :राज्यातील ५००० एस टी बसेस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार

दरम्यान उद्या मंगळवारपासून बीडहून तीनही प्रकारातील बस भाविकांच्या मागणीनुसार अयोध्येच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. तसेच आगामी काळात भाविकांच्या प्रतिसादावर बस कायम ठेवायचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, काशी, प्रयागराज, अयोध्या किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यात पहिल्यांदाच लालपरी पाठवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाकडून घेण्यात येत असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.