कडा
बदलापूर संबंधी बातमी : फाशी दया, फाशी, बदलापूर येथील चिमुकलीला न्याय द्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील कडा येथे शाळकरी मुलींनी निषेध मोर्चा काढला.सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हजार विद्यार्थींनी एकत्रीत येऊन बदलापूर घटनेचा निषेध केला.
आष्टी तालुक्यातील कडा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोतीलाल कोठारी विद्यालय,पी एम मुनोत ज्युनिअर कॉलेज, रसिकलाल धारीवाल डी फार्मसी कॉलेज,भगिनी निवेदिता विद्यालय, श्रीराम विद्यालय, जुनिअर कॉलेज यांच्यासह सर्व शाळकरी मुलींनी एकत्र येत गावातून शांतता निषेध मोर्चा काढला. हातात निषेधाचे फलक घेऊन घोषणा देत हा मोर्चा कडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आला.यावेळी महिलांनी काळ्या फिती लावल्या होत्या, तर काळे ड्रेस परिधान केले होते.
यावेळी मुलींनी आपला आक्रोश भाषणातून व्यक्त केला.बदलापूर आणि कोलकाता येथील घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असून या घटनेतील आरोपींना जलदगतीने न्यायप्रक्रिया चालवून शिक्षा देण्यात यावी. त्याचप्रमाणे यापुढे महिलांवर अत्याचार होणार नाहीत , यासाठी संपूर्णपणे सामाजिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत . फक्त बेटी बचाव , बेटी पढाव असा शाब्दिक नारा न देता मुली , महिला समाजात निर्भयपणे फिरू शकतील अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली .