औरंगाबाद
Aurnagabad railway pit line रेल्वेस्टेशनवर पीटलाइनचे ( रेल्वे कोच देखभाल सुविधा ) भूमीपूजन व पायाभरणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज संपन्न झाले. याप्रसंगी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खा. इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सतीश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनची पाहणी केली. रेल्वेस्टेशनच्या पुर्नविकास आराखड्याचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे भारतीय रेल्वेत आमुलाग्र परिवर्तन – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
मराठवाड्याच्या पावनभूमीला नमन करतो असे मराठीत सांगत व पसायदानच्या जो जे वांछील ते तो लाहो या ओळी सांगत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंचावर उपस्थित असलेले स्वपक्षीय व विरोधी नेते यांच्या मराठवाड्यातील रेल्वे मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीने पुर्ण होतील असे आश्वासित केले. मागील काळात रेल्वे स्थानकांची रंगरंगोटी, रेल्वेच्या देखभालीवर करण्यात येणाऱ्या खर्चाला विकासाचे नाव दिले जायचे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा रेल्वेशी लहानपणापासूनच भावनिक बंध आहे, मी व रावसाहेब दानवे यांना रेल्वे खाते दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला रेल्वे स्टेशन विकास आराखडा मांडण्यास सांगितला, दोन ते तीन महिन्याच्या मेहनतीनंतर आम्ही तो मांडला त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आजच्या काळासाठी हा विकास आराखडा चांगला आहे मात्र पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन हा आराखडा पुन्हा एकदा करण्यास सांगितले. आज याचा प्रत्यय येत आहे, भारतातील २०० रेल्वे स्थानक ही आधुनिक होणार आहे. निवडलेल्या या दोनशे रेल्वे स्थानकांपैकी ४७ स्थानकांचे टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली असुन ३२ स्थानकांवर प्रत्यक्ष काम सुरु झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिली. वंदे भारत, बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन व भारत गौरव सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वे या आठ वर्षात भारतात आल्या. १८० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या वंदे भारत या रेल्वेत पाण्याचा ग्लास जराही हलत नाही या भारतीय तंत्रज्ञानाचे कौतुक जगात झाले. युरोप व जपान सारखे आधुनिकीकरण व तंत्रज्ञान आपण भारतात विकसित केले हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. या २०० रेल्वे स्थानकांत लहान मुलांसाठी खेळण्याच्या जागेपासून स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ असणार आहे. रेल्वेच्या गुंतवणुकीवर परतावा हे निकष आता बदलले असुन केंद्र सरकार मोदीजींच्या नेतृत्वात अधिक संवेदनशील आहे, निर्णय घेताना त्या भागाचा विकास व तेथील जनतेला संधी मिळावी हा निकष पाळत हे सरकार निधी देताना भेदभाव करत नसल्याचे सांगत २०१४ पुर्वी महाराष्ट्राला रेल्वेसाठी ११०० करोड मिळायचे ते आज ११००० करोड रुपये मिळतात असे स्पष्ट केले. २०१४ पुर्वी रेल्वे रुळ टाकण्याची गती ७ किमी प्रति दिवस होती ती आता १४ किमी प्रति दिवस आहे व भविष्यात अजुन वेगाने रेल्वे रुळ टाकण्याचे काम होईल असे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद व जालना रेल्वे स्थानकांची आधुनिक स्थानकांसाठी निवड, निधी मंजूर – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
मंत्री महोदय आले की स्थानिक नेत्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, आम्ही विरोधी पक्षात असताना मागण्या करायचो मात्र त्या अद्याप पुर्ण झाल्या नाहीत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वात २०१४ साली केंद्रात नवीन सरकार आले व त्यापुर्वी महाराष्ट्राला रेल्वेसाठी मिळणाऱ्या ११०० कोटी रूपयांत दहा पट वाढ होऊन ११००० कोटी रुपये मिळायला लागले. औरंगाबाद व जालना रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी १८० व १६८ करोड रुपये मंजूर झाले आहे असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात सांगितले. औरंगाबाद रेल्वे स्थानक हे वेरूळ लेणींच्या धर्तीवर विकसित होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या मिळणाऱ्या निधीमुळे बहुतांश रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण २०२३ अखेरपर्यंत पुर्ण होईल व डिझेलवर होणाऱ्या खर्चाच्या एक तृतियांश खर्चात आपण महाराष्ट्रातील रेल्वे चालवू असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. लातूर जिल्ह्यात वंदे भारत रेल्वे कोच निर्मिती सुरु आहे, मनमाड ते औरंगाबाद रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचा अंतिम आराखडा मंजूर झाला आहे या सर्व बाबींमुळे मराठवाड्याचा विकास होईल असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.