कडा,
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अंभोरा गाव ग्रामविकासाच्या अभिनव उपक्रमांमुळे राज्यात आदर्श ठरत आहे. ग्रामपंचायतमार्फत ग्रामस्थांना विविध सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सुशासन, लोकसहभाग आणि सर्वसमावेशक विकासाच्या धोरणामुळे अंभोरा ग्रामपंचायतीला नुकतेच ISO मानांकन मिळाले असून गावाच्या विकासाला नवे परिमाण मिळाले आहे.
ग्रामस्थांसाठी मोफत सुविधा
अंभोरा ग्रामपंचायत गावातील सर्व नागरिकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी पुरवते. तसेच ग्रामपंचायतीच्या स्वमालकीच्या पीठ गिरणीद्वारे करभरणा केलेल्या नागरिकांना वर्षभर ज्वारी, बाजरी, गहू आदी धान्यांचे मोफत दळण करून दिले जाते. या कामासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र कर्मचारीही नियुक्त केला आहे.याशिवाय गावात तेल काढणी यंत्र, मिरची कांडप यंत्र आणि कडबा कुट्टी यंत्र उपलब्ध असून ग्रामस्थांना या सेवाही मोफत दिल्या जातात.
महिलांसाठी विशेष सुविधाग्रामपंचायत संचलित सखी प्रेरणा भवन हे गावातील महिलांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. येथे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि स्मार्ट बर्नर बसविण्यात आले असून महिलांच्या आरोग्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे.
गावातील स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पादन वाढीसाठी बंदिस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी मोफत उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण आणि निरक्षर महिलांसाठी साक्षरता वर्ग आयोजित केले जातात. यासाठी WOTR या संस्थेची मदत घेतली जाते.
ज्ञान आणि शिक्षणासाठी उपक्रम
गावात नव्याने उभारलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ज्ञानमंदिर ग्रामस्थांच्या सेवेत दाखल झाले आहे. येथे ग्रंथालय, वाचनालय आणि अभ्यासिका या सुविधा ग्रामपंचायतमार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सवय लागावी म्हणून दररोज सायंकाळी ६ वाजता अभ्यास सायरन वाजवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सायरन वाजल्यानंतर विद्यार्थी रात्री ८ वाजेपर्यंत अभ्यासाला बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.तसेच गावातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट शूज देण्यात आले आहेत आणि जिल्हा परिषद शाळेसाठी प्रशस्त स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे.
आरोग्य आणि सामाजिक उपक्रम
ग्रामपंचायतमार्फत नियमितपणे महिलांसाठी ॲनिमिया तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी केली जाते.गावात ग्रामदरबार उपक्रम राबवून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच ग्रामस्थांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे देखील आयोजित केली जातात.
शेती व पर्यावरणासाठी उपक्रम
ग्रामपंचायतमार्फत ३५० करदात्यांना फवारणी पंपांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले आहे. झाडांचे उत्तम जतन करणाऱ्यांसाठी ३००१ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत दोन शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
पायाभूत सुविधा आणि डिजिटल सेवा
गावातील मुख्य रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारपेटी बसविण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवरून सेवा दाखल्यांसाठी अर्ज आणि तक्रार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विवाहासाठी सभागृह व सामाजिक उपक्रम
ग्रामपंचायत समोर लोकसहभागातून प्रशस्त सभागृह उभारण्यात आले आहे. या सभागृहात विवाह सोहळ्यासाठी ५,००० रुपये शुल्क आकारले जाते. त्याच कार्यक्रमात मुलीच्या वडिलांना कन्यादान योजनेतून ५,००१ रुपये ग्रामपंचायतमार्फत देण्यात येतात.
ISO मानांकनाने गावाचा सन्मान
अशा विविध विकासात्मक आणि लोकाभिमुख उपक्रमांमुळे अंभोरा ग्रामपंचायतीला नुकतेच ISO मानांकन मिळाले आहे. त्यामुळे अंभोरा गावाच्या विकासाला नवे स्थान मिळाले असून ते सुशासनयुक्त आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
प्रतिक्रिया
“अंभोरा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे.”— सागर आमले, लोकनियुक्त सरपंच, अंभोरा
“गावातील शेवटच्या वंचित घटकाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करत आहोत. संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार लोकसहभागातून ग्रामविकास साध्य करत आहोत.”— दिपक नरवडे, ग्रामविकास अधिकारी, अंभोरा