अहिल्यानगर-१५
दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर रेडिओ किसान दिवसाच आयोजन करण्यात येत. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रातही काल रेडिओ किसान दिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
आकाशवाणी आणि शेतकरी बांधवांच नातं हे किसानवाणी आणि आमचा शेत आमचा परिसर या कृषी विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून वृद्धिंगत व्हावं या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी अहिल्यानगरचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ उमेश पाटील, जिल्हा परिषद अहिल्यानगरचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे , महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.सचिन सदाफळ, अहिल्यानगरचे उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे,
कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने चे प्रमुख शास्रज्ञ डॉ एस.एस.कौशिक , एनडीडीबी डेअरी सर्विसेस –राहुरी सिमेन्स स्टेशनचे महाव्यवस्थापक डॉ सरोज वहाने , दैनिक सकाळ,अहिल्यानगरचे सह संपादक प्रकाश पाटील, दैनिक लोकमत अहिल्यानगरचे निवासी संपादक सुधीर लंके ,आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
रेडिओ हा शेतकऱ्याचा मित्र, मार्गदर्शक आणि आवाज आहे. शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र शेतकरी बांधवांसाठी काम करत असल्याचे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण, उल्लेखनीय काम करणारे,प्रगतशील अशा निवडक नव्वद शेतकरी बांधवांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
रेडिओ किसान दिवस हा शेतकरी आणि रेडिओ यांच्यातील अतूट नात्याचा उत्सव आहे. रेडिओ आजही ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह माहितीचे माध्यम ठरतो. पेरणी, हवामान अंदाज, पीक संरक्षण, बाजारभाव आणि शासकीय योजना यांची योग्य वेळी मिळणारी माहिती शेतकऱ्यांना मोठा आधार देते.
आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राने शेतकऱ्यांसाठी खास कृषी विशेष कार्यक्रम किसानवाणी आणि आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव आणि स्थानिक भाषेत दिलेले सल्ले यामुळे शेतकरी आणि शासन यांच्यातील दुवा मजबूत केला आहे.
आधुनिक शेती, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती, हवामान बदल अशा विषयांवर रेडिओ मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यास मदत करतो. पाणीटंचाई, बदलते हवामान, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील अडचणी यावर उपाय सुचवण्यासाठी रेडिओ प्रभावी माध्यम आहे.
तसेच तरुण पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी प्रेरणादायी कथा आणि नवतंत्रज्ञानाची माहिती रेडिओवरून दिली जाते.सन्मानित शेतकरी बांधवानी सुद्धा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे ,वरिष्ठ अभियांत्रिकी सहायक गजेंद्र पवार,वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष साबळे,पांडुरंग जोशी,जयंत लाटे,संतोष मते,सोमनाथ कांडके,अंकुश जोशी,रेखा शेटे,शीतल ठोंबरे,अक्षता अन्नदाते,गौरव वने, ज्ञानेश्वर राऊत ,रवींद्र दातीर,किरण जाधव,विष्णू रच्चा आदी उपस्थित होते.