Ahmednagar ideal principal award

ताज्या बातम्या

सारडा महाविद्यालयाचा प्रथम आदर्श प्राचार्य पुरस्कार डॉ. प्रदीप मच्छिंद्र दिघे यांना जाहीर

By admin

September 05, 2023

 

गुरुवारी कुलगुरूंच्या हस्ते वितरण.

अहमदनगर

Ahmednagar ideal principal award पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील स्व. प्राचार्य एस. एम. कुलकर्णी आदर्श प्राचार्य पुरस्कारासाठी लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला – शास्त्र – वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप मच्छिंद्र दिघे यांची निवड आज घोषित करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते आणि नामवंत शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत येत्या गुरुवारी, 7 सप्टेंबर रोजी सावेडी रस्त्यावरील माऊली सभागृहात सकाळी 10.30 वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे.

पेमराज सारडा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणावरील राष्ट्रीय परिसंवादाचेही यावेळी उद्घाटन होईल. हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य श्यामकांत माधवराव कुलकर्णी यांची जन्मशताब्दी नुकतीच संपन्न झाली. महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर 1962 ते 1974 या काळात शिक्षणतज्ञ कुलकर्णी कार्यरत होते.

प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी महाविद्यालयाची निकोप पायाभरणी केली. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हिंद सेवा मंडळाने पुणे विद्यापीठ स्तरावरील या पुरस्काराची योजना यंदाच्या वर्षीपासून सुरू केली. 25 हजार रुपये ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

1960 च्या दशकात ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन स्व. कुलकर्णी यांनी सारडा महाविद्यालयाचे वसतीगृह सुरू केले.

विविध उपक्रमांतून शिक्षण आणि वंचित समाज यांची नाळ जोडली. मंडळाच्या अनाथ विद्यार्थी गृहाशी त्यानी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांना जोडले.

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राचार्यांना उच्च शिक्षणात समाजाभिमुख आणि तृणमूल कार्यासाठी स्व.कुलकर्णी यांच्या पुरस्काराने प्रोत्साहन मिळेल असे मंडळास वाटते.

 

Ahmednagar ideal principal award  निवड प्रक्रिया

 

कुलगुरू डॉ.गोसावी यांच्या अध्यक्षतेखालील प्रा. रवींद्र शिंगणापूरकर , डॉ. ज्योती भाकरे , डॉ. प्रभाकर देसाई तसेच हिंद सेवा मंडळातील प्रा. शिरीष मोडक, श्री. मधुसूदन सारडा, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी आलेल्या प्रस्तावांचे तपशीलवार आणि तुलनात्मक अध्ययन केले.

विविध 17 मुद्द्यांप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवांचा आणि नागरिकत्वाचा विकास ,शिक्षणातील आणि संशोधनातील असामान्य गुणवत्ता,तसेच आजी – माजी विद्यार्थी आणि सहकारी प्राध्यापक यांचा अनुभव हे निकष पुरस्कार निवडीसाठी विचारात घेण्यात आले.

 

 

आदर्श प्राचार्य प्रथम पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले डॉ.दिघे गेली 6 वर्षे लोणी येथे पद्मश्री विखे महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत .

NAAC अधिस्वीकृतीत महाविद्यालयाला मिळवून दिलेला सर्वोत्तम दर्जा , विविध विषयातील संशोधनाचे अखिल भारतीय स्तरावरील अव्वल उपक्रम, स्पर्धा परीक्षांसाठीचे तसेच रोजगार शिक्षणाचे दर्जेदार केंद्र आणि दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना त्यामुळे मिळालेले यश, महाविद्यालयात केलेला अपारंपारिक ऊर्जेचा 100 टक्के उपयोग, केंद्र शासनाच्या आयुष -विज्ञान आणि तंत्रज्ञान – खादी आणि ग्रामोद्योग केंद्रीय संशोधन संस्था यांच्यासोबत महाविद्यालयाने राबविलेले अनोखे उपक्रम, विविध कंपन्यांकडून अभिनव उपक्रमांसाठी सीएसआर अंतर्गत मिळवलेले निधी,यांची नोंद पुरस्कार निवड समितीने घेतल्याचे उपक्रमाचे संयोजक अनंत देसाई यांनी सांगीतले यावेळी स्वर्गीय प्राचार्य कुलकर्णी यांच्यावरील प्राचार्य या स्मृतीग्रंथाचे प्रकाशनही यावेळी होणार आहे.