ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्र येथे पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
अहमदनगर,दि.17 :- ऐतिहासिक लिखाण असलेल्या पुस्तकाचा उपयोग अहमदनगर जिल्हयाचा इतिहास जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहोचण्यासाठी होणार आहे. यातून सर्वांना प्रेरणा मिळेल, त्यासाठी ऐतिहासिक लिखाणातून समाजमनाच्या स्थित्यंतराबाबत आणि तत्कालीन सामाजिक संदर्भाबाबत माहिती मिळावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे केले.
अहमदनगर येथील ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्र येथे पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर जिल्हयातील प्राचीन मंदिर सौंदर्य या संगिता कळसकर लिखीत पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्राचे कार्यकारी विश्वस्त डॉ.रविंद्र साताळकर, इतिहास अभ्यासक व संशोधक पांडुरंग बलकवडे, मोडि तज्ज्ञ डॉ.चंद्रकांत अभंग, टीळक महारष्ट्र विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.डी.कुलकर्णी, उद्योगपती नरेंद्रकुमार फिरोदिया उपस्थित होते.
हेही वाचा:कोरोना बधितांची संख्या शतकाच्या पुढे;१४५ रूग्णांना डिस्चार्ज
यावेळी बेालताना जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले, पूर्वीच्या काळात भारतात अस्तित्वात असलेली गुरुकुल शिक्षण पध्दत आदर्श शिक्षण पध्दत होती. विविध विद्यांचा अभ्यास येथे होत असे त्यामुळे समाजाचा सर्वांगिण विकास होत होता. मात्र काळाच्या ओघात, इंग्रजांनी ही शिक्षण पध्दत बंद केली त्यामुळे भारतीय समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. ऐतिहासिक लिखाण असलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून अहमदनगर शहराचा इतिहास जास्तीत जास्त लोकांना माहित होणार आहे. ऐतिहासिक वस्तु संग्रहालयातील अमुल्य ठेवा शालेय विद्यार्थ्यांपर्यत पोहोचावा यासाठी जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांनी या वस्तु संग्रहालयाला भेट देण्यासाठी संबधितांना सूचित करण्यात येईल. पर्यटनाच्यादृष्टीने आवश्यक सुविधा पुरविण्यात येउुन वस्तुसंग्रहालयाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिले.
इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी वस्तुसंग्रहालयाची मुहूर्तमेढ सुमारे साठ वर्षापूर्वी झाली, शासनाने केलेल्या सहकार्यामुळे वस्तुसंग्रहालयाची प्रगती झाल्याचे सांगितले. हे वस्तुसंग्रहालय अहमदनगर शहराची ओळख असून तो चालता बोलता इतिहास आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. उद्याची पिढी घडविण्यासाठी संग्रहालये उपयोगाचे आहेत असे त्यांनी सांगितले.
उद्योगपती नरेंद्रकुमार फिरोदिया यांनी, खुप कमी शहरांना स्वत:चा वाढदिवस असतो, त्यापैकी अहमदनगर एक आहे असे सांगितले. शहराचा इतिहास पुढील पिढीपर्यत नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या इतिहासावर संशोधन करणाऱ्यांना शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशनतर्फे आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सुरुवातीला वस्तुसंग्राहलयाचे संस्थापक कै.आबासाहेब मुजुमदार यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पेशवेकालीन जेजुरी ऐतिहासिक दस्तऐवजाबद्दल राज मेमाणे, मंदिर सौंदर्य या पुस्तकासाठी संगिता कळसकर, संजय दळवी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेखा चेमटे यांनी केले तर विश्वस्त भूषण देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हा सूचना अधिकारी जी.एन.नकासकर, अभिरक्षक डॉ.संतोष यादव, इतिहासप्रेमी नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
[…] हेही वाचा:ऐतिहासिक लिखाणातून समाजमना… […]