68th maharashtra kesari wagholi

क्रीडा

68th maharashtra kesari wagholi महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूरच्या मल्लांची दमदार कामगिरी; गादी विभागात पुण्याचा दबदबा

By admin

March 20, 2026

माती विभागात महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख विजयी; गादी विभागात शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ यांचा एकतर्फी विजय

पुणे :

68th maharashtra kesari wagholi ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज झालेल्या लढतींमध्ये माती आणि गादी या दोन्ही विभागांत रंगतदार सामने पाहायला मिळाले. विशेषतः सोलापूर आणि पुणे येथील मल्लांनी आपला दबदबा दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र केसरीचा थरार पुण्यात चांगलाच रंगला.

68 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्‍यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्‍ती स्‍पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी किताबाचे दावेदार असलेले महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षे, बाळू बोडके, पृथ्वीराज मोहोळ, नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, सोलापूरचा पृथ्वीराज पाटील आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी प्रतिस्पर्धी मल्लांचा पराभव करीत आगेकूच केली.

वाघोली येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत या स्‍पर्धा सुरु आहेत. महाराष्ट्र केसरी मैदानातील माती विभागात महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेने पहिली फेरी जिंकून दिवस गाजविला. सोलापूरचा अनुभवी महेंद्र गायकवाडने उत्कंठावर्धक लढतीत विशाल बनकरला 6-1 गुणांनी नमवून विजयी सलामी दिली. कोल्हापूरच्या बलाढ्य माऊली जमदाडेवर नाशिकच्या बाळू बोडकेने 10 -5 गुणानी सनसनाटी विजय नोंदविला.

माती विभागात पुणे जिल्ह्याचा अनिकेत मांगडे व हिंगोलीचा सिकंदर शेख यांच्यात कुस्ती रंगली. अनिकेतने पहिला गुण मिळवला. ताबा मिळविताना दोन गुणांची सिकंदरने कमाई करीत पहिल्या फेरीत 2-1 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सिकंदरने पुन्हा ताबा मिळवताना दोन गुण मिळवले. सिकंदरने अनिकेतच्या पटाला लागत पुन्हा ताबा मिळवत दोन गुण मिळवले. 8-1 अशी सात गुणांच्या फरकाने विजयी सलामी दिली

गादी विभागात पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने 10 गुण मिळवत विजयी सलामी दिली. दुसरी कुस्ती शिवराज राक्षे आणि प्रतीक जगताप यांच्यात लावण्यात आली. सुरवात करताना प्रतीक याने सुरवातीला दोन गुण मिळवले. परंतु धारांग डाव टाकत शिवराज राक्षे याने हे दोन गुण वसूल करीत 10 गुणांची कमाई करीत विजयी आगेकूच केली.

सोलापूरचा पृथ्वीराज पाटील आणि पालघरच्या वैभव माने यांच्यात गादी विभागात कुस्ती लावण्यात आली. पृथ्वीराज याने पहिला गुण घेत आपले खाते उघडले. पृथ्वीराज याने वैभव याचा 8-0 असा पराभव करीत आगेकूच केली.

गादी विभागात अनुभवी मल्ल नाशिकचा हर्षवर्धन सदगीर व राष्ट्रीय कुस्ती विजेता बीडचा प्रतीक देशमुख यांच्यात कुस्ती लावण्यात आली. हर्षवर्धन याने एक गुण मिळवीत खाते उघडले. पहिल्या फेरीत हर्षवर्धन याने 4 – 0 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धन याने आणखीन 6 गुणांसह 10-0 असा विजय मिळवीत आगेकूच केली.

माती विभागात 57 किलो वजनी गटात कोल्हापूरच्या राधानगरी येथील हनुमान तालीम राशिवडे येथील मल्ल मृणाल पाटील याने सुवर्ण पदक तर सुदर्शन पाटील याने कांस्य पदक पटकावले आहे. हे दोन्ही मल्ल सागर चौगुले व नितीन कांबळे यांचे पठ्ठे आहेत.