कडा आष्टी तालुक्यामध्ये गेल्या एक वर्षापासून आष्टी ते साबलखेड या 17 किलोमीटर अंतरावर खड्ड्यांचा प्रश्न गाजत आहे.
गेल्या वर्षी मुरुमाने मलमपट्टी करून खड्डे भरले मात्र पुन्हा यावर्षी जूनमध्ये पावसाळा सुरू झाला आणि खड्ड्यांचा प्रश्न गाजतच राहिला.तब्बल तीन महिन्यापासून निवेदने,तोंडी सूचना प्रशासनाला दिल्या मात्र यावर कुणीही लक्ष दिले नाही.
आष्टी मतदार संघात विधानसभा व विधानपरिषद असे दोन आमदार असतानाही रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याचा गंभीर आरोप कडा येथील रस्ता रोको प्रसंगी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
कडा येथे रविवारी सकाळी 11 वाजता आंबेडकर चौक येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
. साबलखेड ते आष्टी या 17 किमी अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे त्याचप्रमाणे किरकोळही अपघात या ठिकाणी दररोजच होत आहेत.
काही ठिकाणी तर तब्बल 20-20 फुटाचे खड्डे झाल्याने व सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये मृत्यूला आमंत्रण देणारा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला आहे.
राष्ट्रीय काँग्रेसने हा प्रश्न अनेक वेळा निवेदने दिली तसेच प्रशासनाला वेळोवेळी भेटून हा प्रश्न कानावर घातला मात्र तरीही झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
तालुक्यामध्ये दोन आमदार असतानाही रस्त्याचा प्रश्न निकाली निघत नाही यामुळे हा रस्ता रोको आंदोलन करत असल्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी सांगितले .
याप्रसंगी आज कडा येथील आठवडी बाजार असल्याने एक तासाच्या रस्ता रोकोमुळे अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. नायब तहसीलदार बाळदत्त मोरे यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बीड येथील अधिकाऱ्यांची तात्काळ आष्टी येथे बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी काँग्रेसचे सचिन घोडके ,काकासाहेब कर्डिले, छगन कर्डिले ,महाडिक ,दीपक गरुड बबलू आखाडे ,लालासाहेब शिंदे,पोपट गर्जे, सचिन गोंदकर, यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान रस्ता रोकोच्या वेळी सपोनी विजय देशमुख व भाऊसाहेब गोसावी यांनी चोखबंदोबस्त ठेवला.