ताज्या बातम्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळण्यातून शिक्षणाला महत्व

By admin

January 17, 2023

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळण्यातून शिक्षणाला महत्व

आष्टी : प्रतिनिधी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळातून आणि अनुभवावर आधारित शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी खेळण्यातून शिकण्याची गरज असल्याचे आष्टीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवराज पाटील,उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल चानोदिया,गोकुळदास मेहेर,मुख्याध्यापक नवनाथ पडोळे,प्राचार्य नंदकुमार राठी,ज.मो. भंडारी,विस्तार अधिकारी अर्जुन गुंड,बाबूशेठ भंडारी,शोभाचंद ललवाणी,सिद्धेश्वर शेंडगे,स्वानंद थोरवे,लक्ष्मण बोरसे,मथाजी शिकारे, पत्रकार राजेश राऊत,मनोज सातपुते,रघुनाथ कर्डीले, राजु तांगडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना यादव म्हणाले की, सध्या माहिती तंत्रज्ञान व खेळणी साहित्यद्वारे विज्ञान शिकवणे हा शासनाचा मूलभूत हेतू असून विद्यार्थ्यांनी विज्ञान शब्द कोडे तयार करून त्यामध्ये रममान व्हा. तसेच उत्कृष्ट विज्ञान शब्दकोड्यांना शिक्षण विभाग राज्यभर प्रसिद्धी देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा व राज्यस्तरावर प्रयोग विज्ञान प्रदर्शनातून वेगवेगळे प्रयोग करण्याची ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी असते. विद्यार्थ्याकडून वेगवेगळे प्रयोग करून घेण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून अनुभवातून प्रयोग करणे ही काळाची गरज असून अनुभवातून केलेले प्रयोग हे कायमस्वरूपी टिकून त्याचे परिणाम चांगले होतात. येणाऱ्या काळात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रयोगाला फार मोठे महत्त्व असून प्रयोगामुळे अनुभवातून अनेक शोध लावता येणार आहेत.

ग्रामीण भागातही शास्त्रज्ञ घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग करण्याचे आवाहन यादव यांनी केले. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी अर्जुन गुंड यांनी विज्ञान प्रदर्शनाची संकल्पना स्पष्ट करून विज्ञान प्रदर्शनाचे फायदे विशद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप भाषणात मुख्याध्यापक नवनाथ पडोळे यांनी सांगितले की, मोतीराम कोठारी विद्यालयांमध्ये अनेक वर्षानंतर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होत असून सर्व सोयी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

यापुढेही विज्ञान प्रदर्शन किंवा इतर शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी संस्था तालुकास्तरावर सर्व  मदत करेल. यावेळी आष्टी तालुक्यातील अनेक माध्यमिक व प्राथमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.डी. चव्हाण यांनी केले तर आभार पुष्पलता जरे यांनी मानले.