ताज्या बातम्या

राज्यसभा: रजनी पाटील यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा

By admin

September 27, 2021

भाजपच्या माघारीने रजनी पाटील यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा

मुंबई-प्रतिनिधी

भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी राज्यसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कॉंग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी राज्यसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपच्या उमेदवाराने माघारी घ्यावी असं आवाहन केलं होतं.

राज्यसभा पोटनिवडणूक

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, अशी विनंती फडणवीस यांच्याकडे केली. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करुन भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केली आणि भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानुसार संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.