पुणे मेट्रो रेल्वे

ताज्या बातम्या

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन- मेट्रोचे पुणेकरांचे स्वप्न पूर्ण

By admin

March 06, 2022

 

पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील गरवारे स्थानकावर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. पुण्यातील नागरी गतिशीलतेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रकल्प आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली होती. एकंदर ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पापैकी १२ किमी लांबीच्या मार्गाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केले. हा संपूर्ण प्रकल्प 11, 400 कोटी रुपयांहून अधिक खर्चानं बांधला जात आहे.

मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकावरील प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणीही केली आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पुणे मेट्रो रेल्वे

तत्पूर्वी, पुणे महापालिकेच्या आवारातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलपासून बनलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.

पुणे मेट्रो रेल्वे (3)

विकास प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे आपल्या सरकारने सिद्ध केले आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पुण्यात आज अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प पुणेकरांचे स्वप्न पूर्ण

पंतप्रधान म्हणाले की, भारतातील शहरी लोकसंख्या 2030 पर्यंत 60 कोटींवर जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संधी आणि आव्हानेही समोर येत आहेत.

शहरामध्ये उड्डाणपूल आणि रस्ते रुंदीकरणासारख्या वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर मर्यादा आहेत त्यामुळे मेट्रो रेल्वे सारखी सार्वजनिक वाहतूक हा एकमेव पर्याय आहे, असे ते म्हणाले. मोदींनी विशेषतः शिकलेल्या लोकांना मेट्रो सेवा वापरण्याची सवय लावण्याचे आवाहन केले, ज्याचा फायदा त्यांच्या शहराला होईल.

अधिक हिरवीगार वाहतूक, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक टू व्हीलर, इंटिग्रेटेड कमांड सेंटर्स, सर्वोत्तम व्यवस्थापन प्रणाली आणि पाणी शुद्धिकरण प्रकल्प शहरांना जलयुक्त बनविण्यासारख्या योजनांना दृष्टीपथात ठेवून सरकार पुढे जात आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

त्यांनी पुणेकरांना त्यांचं राहणीमान सुखकर करणाऱ्या विविध विकास प्रकल्पांसाठी शुभेच्छा दिल्या.

पुणे मेट्रो रेल्वे (3)

मोदी यांनी आज उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण कमी करण्याच्या पायाभरणीचा समावेश होता. नदीच्या 9 किलोमीटरच्या पट्ट्यात १०८० रुपयांपेक्षा जास्त खर्चानं नद्यांचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे. यामध्ये नदीच्या काठाचे संरक्षण, इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क, सार्वजनिक सुविधा, नौकाविहार इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदी प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे.

प्रकल्पांतर्गत एकंदर 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असेल. बाणेर इऱथं बांधलेल्या ई-बस डेपोचं आणि 140 ई-बसेसचंही पंतप्रधानांनी लोकार्पण केलं.

या अंतर्गत पुणे महानगर परिवहन लिमिटेडला प्रति बस अनुदान मिळणार आहे. दररोज 200 किलोमीटरची सेवा त्यांच्याद्वारे दिली जाणार असून 650 बसेस तैनात करण्यात येणार आहेत.

बालेवाडी, पुणे येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे दूरदृश्य पद्धतीने पंतप्रधानांनी उद्घाटन केले. म्युझियमचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित लघुचित्र मॉडेल जे ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केले जाणार आहे.

व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उप. मुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.