तिरुपती बालाजी

ताज्या बातम्या

तिरुपती बालाजीचे दर्शन करून परतणाऱ्या हिंगोलीतील भाविकांचा कर्नाटकात अपघात तीन भाविक ठार 9 जखमी

By admin

August 01, 2022

 

हिंगोली तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असताना आदमापूर येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी जात असताना हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील भाविकांच्या वाहनाला अपघात झाला.

अपघातात डोंगरकडा येथील तिघेजण जागीच ठार झाले, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना चित्रदुर्ग (कर्नाटक) येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

बंगळुरू महामार्गावरील के. आर. हल्लीगेट चित्रदुर्ग (कर्नाटक) या ठिकाणी डोंगरकडा (ता. कळमनुरी जि.हिंगोली ) येथील भाविकांच्या जीपचा अपघात होऊन डोंगरकडा येथील पती – पत्नी व अन्य एकासह तिघे जण ठार झाले.

या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना चित्रदुर्ग (कर्नाटक) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डोंगरकडा येथील शंकर दत्तराव लोमटे (वय ३५), त्यांच्या पत्नी रेखाबाई शंकर लोमटे (वय ३२), राजू नारायण वानखेडे (वय ३५, सर्व रा. डोंगरकडा) हे तिघेही ठार झाले असून, अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

डोंगरकडा येथील दहा ते बारा जण २६ जुलै रोजी डोंगरकडा येथून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जीपने निघाले होते. हे सर्व जण तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन ३१ जुलै रोजी बंगळुरू महामार्गावरून आदमापूरकडे बाळूमामाच्या दर्शनासाठी जात होते.

बंगळुरू महामार्गावरील वडावल्ली (ता. हिरुर, जि. चित्रदुर्ग) के. आर. हल्लीगेट, चित्रदुर्ग या ठिकाणी गाडीचा अपघात झाला.