चिमुकल्यांनी काढली दिंडी
धानोरा,
लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध वारीत सहभागी होतात.या दिंडीचा अनुभव शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना घेता यावा यासाठी बीड जिल्ह्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेने चिमुकल्यांच्या दिंडीचा उपक्रम राबविला.या दिंडीने पालकांसह ग्रामस्थ भारावून गेले.
वारकऱ्यांच्या पायी दिंड्या सध्या पंढरपूर च्या दिशेने चालत आहेत.या दिंडीत बालकांना शाळेमुळे सहभागी होता येत नाही.मात्र बालकांनाही या दिंडीचा अनुभव यावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा यांनी चिमुकल्यांची दिंडी काढली.शाळेपासून सुरू झालेली दिंडी गावातील मंदिरापर्यंत पोहचली. दिंडीच्या अग्रभागी विठ्ठल रुखुमाई चे रूप बालकांनी साकारले.चिमुकल्यांनी डोक्यावर तुळस घेतली होती.टाळ्यांच्या गजरात अभंग गात या चिमुकल्यांची दिंडी मंदीरात पोहचली.यावेळी विद्यार्थिनी आणि महिलांनी फुगडी खेळून दिंडीचा आनंद लुटला.या दिंडीचे नियोजन शाळेतील शिक्षकांनी केले होते.